Published on
:
31 Jan 2025, 7:59 am
Updated on
:
31 Jan 2025, 7:59 am
संगमनेर शहर : संगमनेर तालुका हा मोठा असून शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र काही विरोधक जनतेत गैरसमज पसरवून राजकीय फायदा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. नागरिकांच्या सोयीसाठीच नविन बदल केला जात आहे. मात्र या संदर्भात अद्याप कुठलाच निर्णय झाला नाही. जनतेच्या सुचना व मागणीचा आदर करूनच अप्पर तहसीलचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून आश्वी बुद्रुक तहसील कार्यालयात बाबत चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने गुरूवारी शासकीय विश्रामगृह येथे ते पत्रकारांशी बोलत होते. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासंदर्भात तहसीलदार धीरज मांजरे यांनी प्रस्ताव तयार केला होता. तो अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे, या संदर्भात जनतेची मते जाणून घेऊन त्यावर चर्चेनंतर निर्णय होणार आहे. मात्र तहसील कार्यालयातील एका अतिउत्साही कर्मचार्याने हा प्रस्ताव विरोधकांना पाठवला. त्याचा शोध घेऊन कारवाई केली जाणार आहे. तहसीलदारांना तसे आदेश दिले आहेत. त्याच्यावर जावक नंबर नाही, सही नाही, कच्चा मसुदा आहे. तोच अध्यादेश असल्याचे भासवून त्याचे राजकीय भांडवल करून तालुक्यात गैरसमज पसरविण्यात आला. हा निव्वळ प्रस्ताव आहे आदेश नाही.
या संदर्भात या विचारणा होऊ लागल्याने खुलासा करणे गरजेचे होते. या तालुक्याचा मी लोकप्रतिनिधी आहे. या प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. जनतेची मते विचारात घेऊनच निर्णय घेतले जातात. अप्पर तहसील बाबत देखील चर्चा केली जाणार आहे. अप्पर तहसील कार्यालया बाबत माहिती न घेता अर्धवट माहितीवर अपप्रचार केला आहे. अनेकांना पराभव पचवता आला नाही, अजूनही ते सावरू शकले नाही.
यामुळे तालुक्यात संभ्रम निर्माण झाला आहे. चाळीस वर्षात विरोधकांनी फक्त राजकारण केले आहे. जर अप्पर तहसील कार्यालय सोयीचे नसेल तर निर्णय होणार नाही. नागरिकांनी विरोधकांच्या अपप्रचार विश्वास ठेवू नका असे आवाहन त्यांनी केले.
सध्या जिल्हा बँकेत भरती बाबत वाद सुरू आहे, आरक्षणाशिवाय भरती करू नये अशी मागणी होत आहे. मात्र यावर तालुक्यातील संचालक व उपाध्यक्ष आपली भूमिका का स्पष्ट करत नाही, असा सवाल करून नेमके आत्ताच यावर आंदोलने का वाढली याचा शोध घेतला पाहिजे.
आमदार अमोल खताळ