बाळ कडेवर घेऊन महिला होमगार्डंनी निवडणुकीत केली बंदोबस्ताची ड्युटी:निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून होमगार्डसच्या कार्याचे कौतूक

6 hours ago 1
६७० रुपयांचे तुटपुंजा दैनिक भत्ता तरीही आर्थिक गरज म्हणून निवडणूक बंदोबस्तासाठी थेट नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातून एक ते दीड वर्षे वयाच्या बाळाला घेऊन कर्तव्य बजावले. परंतु गृहरक्षक दलातील बहिणींना नवीन सरकार न्याय देणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे. राज्यातील महिलांना निवडणुकीच्या तोंडावर सरकारने महिना दीड हजार रुपये देऊन दिवाळी व भाऊबीज गोड केली होती. राज्य सरकार महिलांप्रती किती संवेदनशील आहे, हे दाखवून दिले. त्याचा राज्यात मोठा गवगवाही झाला. नुकतीच विधानसभा निवडणुका पार पडल्या. निवडणुका निर्भयपणे व कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पाडण्यासाठी या निवडणुकीमध्ये पोलिस अन्य सुरक्षा बल आणि गृहरक्षक दलाने महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात अन्य राज्यासह जिल्ह्यातून पोलिस, सुरक्षाबल तसेच गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. या बंदोबस्तासाठी नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातून काही महिला गृहरक्षक दलाच्या महिला कर्मचारीही नियुक्त केल्या होत्या. यामध्ये कुसुम पाडवी, निर्मला वसावे, कविता वडवी या महिला कर्मचारी एक दीड वर्षांच्या बाळाला घेऊन, तर संगीता वसावे या आपल्या बाळाला घरी घेऊन बंदोबस्तासाठी हजर होत्या. त्यांना शासनाकडून केवळ ६७० रुपये दैनिक भत्ता दिला जातो. इतक्या तुटपुंज्या रकमेत केवळ आर्थिक गरज आणि भविष्यात लाडक्या बहिणी सारखा आपलाही विचार होऊन मानधनात वाढ होऊन वर्षभर बंदोबस्त मिळून उत्पन्नही मिळेल तसेच नोकरीत कायम होऊ या अपेक्षेने त्या लोकशाहीची सेवा करीत आहेत. लहान बाळाला सोबत घेऊन कर्तव्य बजावल्याबद्दल सर्वत्र कौतूक होत असून काही तरी किरकोळ कारणे सांगून कर्तव्यात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रेरणादायी आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद वाघ, पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांनी त्यांचे विशेष कौतूक केले. कर्तव्यही महत्त्वाचे : वसावे माझ्या पतीचे दुर्दैवी निधन झाले आहे. शेतीही नाही. आर्थिक गरज म्हणून काम करावे लागते. आपण बाळाला घरी ठेऊन १५ तारखेपासून कर्तव्य बजावण्यासाठी आलो आहे. घरी फोन केला की आपल्या आठवणीने बाळ रडते. त्यावेळी जीव हेलावतो. पण मुला इतके कर्तव्य महत्त्वाचे आहे, असे होमगार्ड संगीता वसावे यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article