योगी आदित्यनाथ
Published on
:
18 Nov 2024, 1:07 am
Updated on
:
18 Nov 2024, 1:07 am
कोल्हापूर ः हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच भाजप आणि शिवसेनेची युती टिकून होती. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कधीही काँग्रेससोबत गेले नाहीत. परंतु, मूल्य आणि तत्त्वांपासून भरकटल्यानेच उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले. बाळासाहेब ठाकरे असते, तर शिवसेना कदापिही काँग्रेससोबत गेली नसती, असा हल्लाबोल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी केला. महाविकास आघाडीपासून हिंदू समाजासह महाराष्ट्र आणि देशालाही धोका आहे. त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
भाजप महायुतीच्या वतीने कोल्हापुरातील तपोवन मैदानावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झाली. कोल्हापूर शहरात मुख्यमंत्री योगी यांची पहिलीच सभा होणार असल्याने शहरवासीयांत उत्सुकता होती. सभेच्या ठिकाणी त्यांचे ‘जय श्रीराम’ असे म्हणून उपस्थितांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. आपल्या 26 मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्री योगी यांनी अत्यंत आक्रमकपणे हिंदीतून सडेतोड विचार मांडले. व्यासपीठावर खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व महायुतीचे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश क्षीरसागर, महायुतीचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक, करवीरचे उमेदवार चंद्रदीप नरके, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, हातकणंगलेचे उमेदवार अशोकराव माने आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीवर विश्वास ठेवू नका
महाविकास आघाडी समाजात जात, क्षेत्र, भाषेच्या नावाने फूट पाडत आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. काँग्रेसमध्ये इंग्रजांचे जीन्स (गुणसूत्र) असल्याने त्यांना देश कधीच महत्त्वाचा वाटला नाही, असा हल्लाबोल करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटोगे तो कटोगे,’ असाही इशारा जाहीर सभेत दिला. महायुतीच्या योजना गरिबांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्राची सत्ता भाजप महायुतीच्या हाती सोपवा, असे आवाहनही त्यांनी केले.
भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था होईल
2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘ये नया भारत है, छेडेंगे तो छोडेंगे नहीं...’ असा असल्याने पाकिस्तानसह शेजारी राष्ट्रे भारताच्या सीमेकडे ढुंकूनही बघत नाहीत. तसेच भारताची अर्थव्यवस्था 10 व्या स्थानावर होती. आता ती जगातील 5 वी मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. येत्या तीन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल, असा दावाही मुख्यमंत्री योगी यांनी केला.
ही निवडणूक महाराष्ट्र अन् देशासाठीही महत्त्वाची
योगी म्हणाले, ही निवडणूक महाराष्ट्र आणि देशासाठीही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुती, तर देशात ‘एनडीए’ कार्यरत आहे. त्यांच्यासाठी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हेच जीवनाचे ध्येय आहे. भेदभावाशिवाय शासकीय योजना प्रत्येक गावात, गरिबांपर्यंत, शेतकरी, तरुण आणि महिलांना देण्यासाठी कटिबद्ध आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी, समृद्धीसाठी आणि सुशासन हाच त्यांचा मंत्र आहे.
महाविकास आघाडी हिंदू समाजाला धोका देणार
एकीकडे महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवार यांची राष्ट्रवादी, आरपीआय आहे; तर दुसरीकडे नीती नसलेली, नैतिकता नसलेली, निर्णय घेण्याची क्षमता नसलेली अशी महाविकास आघाडी आहे. एकमेकांना मात देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आता ते एकमेकांना धोका देतील. त्यानंतर हिंदू समाजाला आणि नंतर देशाला धोका देतील. काँग्रेसचा इतिहासच भारताला धोका देण्याचा आहे. महाविकास आघाडी तुम्हाला आपसात लढवून पुन्हा त्याच कट्टरपंथी मुसलमानांकरवी भारताच्या एकता आणि अखंडतेला आव्हान देतील. काँग्रेस नेहमी हेच करत आला आहे. काँग्रेसला देश कधीच महत्त्वपूर्ण नव्हता, असा हल्लाबोलही योगी आदित्यनाथ यांनी केला.
फाळणीनंतर लाखो हिंदूंच्या कत्तली
1947 साली काँग्रेस नेतृत्वाने मनात आणले असते, तर भारताची फाळणी झाली नसती. पाकिस्तानची निर्मिती झाली नसती. ज्यांना मुसलमान दंगे करतील, अशी भीती वाटत होती, त्यांना तर आम्ही आज निपटतो तसेच निपटले असते. परंतु, काँग्रेस पक्ष घाबरत होता. त्यांना भीती वाटत होती. सत्तेसाठी काँग्रेसने देशाची फाळणी स्वीकारली. त्यामुळे हजारो वर्षे एकसंध असलेल्या भारताचे दोन तुकडे झाले. त्या बदल्यात आपल्याला काय मिळाले? लाखो हिंदूंच्या कत्तली केल्या गेल्या. आता तर काँग्रेसचे लोक त्या सत्य घटनेलाही स्वीकारायला तयार नाहीत. प्रियांका गांधी काल (शनिवारी) येथे आल्या होत्या, असे सांगून योगी म्हणाले, त्यांनी खरी वस्तुस्थिती सांगितली नसणार. देशाचा विकास, देशाची सुरक्षा, दहशतवाद, नक्षलवाद याविषयी त्यांनी काही सांगितले नसेल. कारण, त्या तुमच्यामध्ये फूट पाडायला आल्या होत्या.
कट्टरपंथी मुस्लिमांनी मल्लिकार्जुन खर्गेंचेही घर जाळले
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात सत्य बोलण्याची हिंमत नाही; पण मी सत्य सांगतो. खर्गे यांचे कर्नाटकात गाव आहे. 1947 मध्ये हैदराबादच्या निजामाच्या रजाकारांनी त्यांचे घर जाळले. त्यात खर्गे यांच्या आई, बहीण आणि इतर कुटुंबीयांचा जळून मृत्यू झाला. तरीही मी ‘बटोगे तो कटोगे,’ असे म्हटल्यावर खर्गे यांना वाईट वाटते. मात्र, खर्गे सत्य मानायला तयार नाहीत. खर्गे यांनी जनतेला सांगावे की, निजाम कोण होते? ते कट्टरपंथी मुसलमान निजाम रजाकार होते. त्यांनी योजनाबद्धरीत्या हिंदूंची उघड उघड कत्तल केली. काँग्रेस नेतृत्वाच्या भीतीनेच खर्गे हे सर्व जनतेला सांगत नाहीत, असेही योगी यांनी सांगितले.
2014 पूर्वी पाकिस्तान सातत्याने घुसखोरी करून आव्हान देत होता. देशात दहशतवाद भडकावत होता. आम्ही त्यावेळी खासदार होतो. संसदेत आवाज उठवत होतो. त्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आम्हाला शेजारी राष्ट्राबरोबरच संबंध खराब होतील, असे सांगत होते. परंतु, आम्ही देशाची सुरक्षा महत्त्वाची की संबंध महत्त्वाचे, असा प्रश्न विचारत होतो. 2014 मध्ये भारतीय जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केले. त्यानंतर पाकिस्तान आता आपल्या सीमेकडे बघतसुद्धा नाही. भारताचे दुश्मन आता आपल्या सीमेकडे फिरकत नाहीत. तसे करायचा त्यांनी प्रयत्न केला, तर त्यांना माहिती आहे, ‘ये नया भारत है... छेडेंगे तो छोडेंगे नहीं... ये नया भारत है... छेडता नहीं है और कोई छेडता है तो छोडता नहीं है...’
श्रीराम मंदिर उभारल्याचे समाधान
निजामाचे कट्टरपंथीय मुसलमान आजही ठिकठिकाणी गणेशोत्सव, रामनवमीनिमित्त निघणार्या मिरवणुकांवर दगडफेक करतात. विशाळगडसारख्या किल्ल्यावर कब्जा करून भारताला अपमानित करतात. आमच्यात फूट होती म्हणून आम्हाला अपमान सहन करावा लागत होता. अयोध्येत श्रीराम मंदिरसाठी अपमान सहन करावा लागला होता. काशी, मथुरेमध्येही हीच स्थिती होती. मात्र, डबल इंजिन सरकारचे काम सुरू झाल्यावर 500 वर्षांपूर्वीच्या श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले. महाराष्ट्रातील महायुती सरकारने येथून जाणार्या भाविकांसाठी अयोध्येत महाराष्ट्र भवनसाठी जागा घेतली आहे. काँग्रेस पक्ष अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण करू शकत होता. मात्र, त्यांनी केले नाही, असे आदित्यनाथ म्हणाले.