Published on
:
21 Nov 2024, 11:49 am
Updated on
:
21 Nov 2024, 11:49 am
शिरूर : पतीचा उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घरी पत्नीला कळताच धक्का सहन न झाल्याने अवघ्या काही वेळातच पत्नीने विष प्राशन करून जीवन संपविले. ही घटना खामकरवाडी (ता. शिरूर कासार) येथे गुरुवारी (दि.२१) सकाळी घडली. पतीचा विरह सहन न झाल्याने पत्नीनेही जीवन संपविले. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
खामकरवाडी या गावातील रहिवासी असलेले आदर्श शिक्षक कन्हैयालाल पांडुरंग खामकर (वय 48) हे शिरूर शहरांमध्ये वास्तवास होते. कन्हैयालाल यांचे बायपासचे ऑपरेशन झालेले होते. गेल्या काही दिवसांपासून खामकरवाडी येथे ते कुटुंबासहित राहत होते. गुरुवारी पहाटे त्यांच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने त्यांना शिरूर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती गावाकडे कळताच खामकर परिवारासह, गावावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. होता. तर इकडे आपल्या पतीच्या मृत्यूची बातमी पत्नी राहीताई कन्हैयालाल खामकर (वय 42) यांच्या कानावर पडताच त्यांना मोठा धक्का बसला. हा धक्का राहीताईला सहन न झाल्याने त्यांनी काही वेळाच्या आतच जवळच असलेल्या कपाशीच्या शेतामध्ये जाऊन विषारी औषध प्राशन केले. ही बाब कुटुंबातील नातलगांच्या लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना ताबडतोब उपचारासाठी शिरूरमध्ये नेले. दरम्यान, त्यांना बीडला पुढील उपचारासाठी नेताना प्रवासादरम्यानच राहीताईचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पती कन्हैयालाल व पत्नी राहीताई या दांपत्याला आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एकाच सरणावरती भडाग्नी देऊन शोकाकुल वातावरणामध्ये खामकरवाडी येथे अंत्यविधी करण्यात आला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.