म्हाडाच्या माध्यमातून सुरू असलेल्या डिलाईल रोड येथील ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील सुरू असलेल्या सात टॉवरपैकी दोन टॉवरचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे 160 चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या येथील बीडीडीवासीयांचे 500 चौरस फुटाच्या अलिशान घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण पुढच्या वर्षी पूर्ण होणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव या तीन बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली होती. ना. म. जोशी मार्ग येथील 32 चाळींमधील 2560 रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी 14 टॉवर उभारण्यात येणार आहेत. या कामासाठी अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
पहिल्या टप्प्यात दहा चाळींच्या जागेवर 22 मजली 7 टॉवर उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. या सात टॉवरचे काम आता विविध मजल्यापर्यंत पोहोचले असून दोन टॉवर डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहेत. जून 2026 पासून रहिवाशांना टप्प्याटप्याने घराचा ताबा दिला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.