Published on
:
04 Feb 2025, 12:48 am
Updated on
:
04 Feb 2025, 12:48 am
कोल्हापूर : भरधाव मोटारीचे चाक डोक्यावरून गेल्याने टाकाळा, माळी कॉलनी येथील जयश्री भीमराव घाटगे (57) जागीच ठार झाल्या. टेंबलाईवाडी रोडवर सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली. पती भीमराव बाबूराव घाटगे (64) गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर चालक मोटारीसह पसार झाला.
टाकाळा माळी कॉलनी येथील नागरिक भीमराव घाटगे पत्नी जयश्रीसह गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे नातेवाईकांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. साखरपुडा आटोपल्यानंतर नातेवाईकांच्या गाठी-भेटी घेऊन हे दाम्पत्य दुचाकीवरून टाकाळा येथील घराकडे परतत होते. टेंबलाईवाडीजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणार्या भरधाव मोटारीने जोरात धडक दिली. त्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या जयश्री रस्त्यावर पुढे जाऊन जोरात डोक्यावर कोसळल्या. डोक्याला वर्मी इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पती भीमराव रस्त्याच्या एका बाजूला जोरात कोसळले. त्यात त्यांनाही गंभीर इजा झाली. रस्त्यावरून येणार्या-जाणार्या वाहनधारकांनी राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. पोलिस पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह त्यांचेही पथक दाखल झाले. पोलिसांनी जखमी भीमराव यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले; तर जयश्री यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. राजारामपुरी पोलिस ठाण्यात अनोळखी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांसह नातेवाईक संतप्त
सीसीटीव्ही फुटेजद्वारे चालकाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले. रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह पडलेला असताना आणि त्यांचे पती गंभीर जखमी अवस्थेत तडफडत असतानाही मोटार चालकाने त्यांना उपचारासाठी कोणतीही मदत न करता अथवा पोलिस ठाण्याला घटनेची माहिती न देता पलायन केल्याने परिसरातील नागरिकांसह दाम्पत्याचे नातेवाईक प्रचंड संतप्त झाले होते.
कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणारा!
संशयितांना तातडीने अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी माळी कॉलनी येथील नागरिकांतून होत आहे. अपघातात जयश्री घाटगे जागीच ठार झाल्याने कुटुंबीय, नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता.