Published on
:
24 Nov 2024, 1:11 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:11 am
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दुसर्यांदा मोठ्या फरकाने काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हत्रे यांचा दारुण पराभव केला. यामुळे आगामी काळात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकात काँग्रेस पक्ष तग धरणार का ? अशी चर्चा तालुका वासियातून होत आहे.
विधानसभाच्या निवडणुका जाहीर होऊन अगदी शेवटच्या घटकापर्यंत काँग्रेस महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र भाजपा महायुतीचे पहिल्या यादीतच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव जाहीर झाल्याने कार्यकर्त्यात जल्लोषचे वातावरण निर्माण झाले, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोशपूर्ण वातावरणात कामाला लागले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 8 ऑक्टोबर 2024 रोजी उजनीच्या पाण्याचे जलपूजन व तालुक्यातील विविध विकास कामाचा प्रारंभ करत प्रचाराचा नारळ फोडला. कित्येक निवडणुका उजनीच्या पाण्यावरून लढविल्या गेल्या मात्र तालुकावासियांना पाणी मिळाले नाही.
राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी शक्ती पणाला लावत नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उजनीचे पाणी कुरनूर धरणात आणण्याकरिता अहोरात्र प्रयत्न करून पाणी आणले, गेली पाच दशके दुरावस्थेत असलेल्या बस स्थानकाच्या कामास प्रारंभ केला. अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या जीर्णोद्धाराचेही काम हाती घेतले. तिन्ही नगरपालिकेसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. तालुक्यातील प्रत्येक गावात रस्ते, वीजेची मोठ्या प्रमाणात कामे केली. तडवळ भागातील खड्डेमय रस्त्यामुळे त्या भागातील त्रस्त नागरिकांनी वारंवार आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे कामाचा पाठपुरावा केला होता. आमदार कल्याणशेट्टी यांनी तात्काळ दखल घेत नागरिकांसाठी दळवळणाची चोख सोय केल्याने त्याचा परिणाम विधानसभा निवडणूकीतील मताधिक्यावर दिसून आला.
काँग्रेस महाविकास आघाडीकडून तालुक्यातून आजतागायत उमेदवारीसाठी स्पर्धा झाली नाही. केवळ एकाच उमेदवाराकडून अर्जाची मागणी होत होती. इच्छुकांची भाऊ गर्दी होत नसे. यंदा मात्र जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील हेही इच्छुक असल्याने तिकीट कोणाला मिळणार याकडे तालुका वासयांचे लक्ष लागून राहिले होते. काँग्रेस पक्षाच्या वतीने अखेर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नावाची घोषणा केली. म्हेत्रे यांनीही मतदारसंघ पिंजून काढला. तालुक्यातील गतकालावधीत झालेली विकास कामे ही माझ्याच कार्यकाळात झाल्याने हा विकास पाहायला मिळत असल्याचे म्हेत्रे हे प्रत्येक सभेत व्यक्त करत होते. मात्र काँग्रेसकडे विकासाचा जाहीरनामा नसल्याने केवळ आरोप प्रत्यारोप होताना दिसून आले.