Published on
:
04 Feb 2025, 11:51 pm
Updated on
:
04 Feb 2025, 11:51 pm
सातारा : भारतीय जनता पक्षाने विविध जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्र्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सातारा तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे धाराशिव जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत विविध जिल्ह्यांच्या संपर्क मंत्रीपदांची घोषणा करण्यात आली. भाजपच्या पदाधिकार्यांची कामे व्हावीत, त्यांना कुठली अडचण येऊ नये, तसेच नागरिकांचे प्रश्न सुलभतेने सुटावेत, यासाठी जिथे भाजपचे पालकमंत्री नाहीत, त्याठिकाणी भाजपच्या मंत्र्यांकडे त्या जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदे देण्यात आली आहेत. लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना सातार्याचे व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना धाराशिव जिल्ह्याचे संपर्कमंत्रिपद देण्यात आले आहे. या दोन्ही नेत्यांकडे राज्याचे कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद आहे. राज्याच्या जबाबदारीसोबतच त्यांच्याकडे दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांचीही जबाबदारी आहे. आता नव्याने ही संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी दिली गेल्याने या मंत्र्यांची व्यस्तता आणखी वाढणार आहे.
दरम्यान, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांमध्ये युती करायची की स्वतंत्र लढायचे, यावरुन अजून निर्णय झालेला नाही. या परिस्थितीत युती झालीच नाही तर ‘शतप्रतिशत भाजप’ असा नारा देण्याचा हेतू ठेवूनच भाजपने मंत्र्यांकडे जिल्ह्यांच्या संपर्क मंत्रीपदांची जबाबदारी दिली असल्याची चर्चा सुरु आहे. सध्याच्या घडीला भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांनी पक्षबांधणीचे काम वेगाने हाती घेतले आहे.