मंत्रालयातील अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी ‘फेशिअल रेकेग्निशन सिस्टम’(एफआरएस) सुरू करण्यात आली आहे. पण तरीही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी मंत्रालयात प्रचंड गर्दी उसळली होती. आमदारांच्या मोटारी आणि त्यातून आलेल्या कार्यकर्त्यांना मंत्रालयात थेट प्रवेश मिळत होता. ‘फेस रिडिंग’ झालेले नसल्यामुळे गेटवरील पोलिसांनी एका आमदाराला रोखण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्त्यांसमोरच अडवल्याने या आमदाराची तळपायाची आग मस्तकाला भिडली. संतापलेल्या आमदाराने तमाशा सुरू केला अखेर पोलिसांनी नमते घेतले आणि या आमदारांना मंत्रालयात प्रवेश दिला.
मंत्रालयात फेशिअल रेकेग्निशन सिस्टम (एफआरएस) नव्याने सुरू केली आहे. या सिस्टमच्या पहिल्याच दिवशी सोमवारी प्रचंड गोंधळ उडाला होता. आज मंत्रिमंडळाची बैठक होती. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते मंत्रालयात आले होते. त्यामुळे मंत्रालयाच्या संपूर्ण यंत्रणेवर प्रचंड ताण पडला होता. सर्वाधिक गर्दी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहाव्या दालनाच्या बाहेर होती. सहाव्या मजल्यावर चालायला जागा नव्हती. महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या दालनाबाहेरही ‘लाडक्या बहिणी’मोठय़ा संख्येने होत्या. इतर मंत्र्यांकडेही गर्दी होती.