दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध रहावेFile Photo
Published on
:
18 Nov 2024, 1:01 pm
Updated on
:
18 Nov 2024, 1:01 pm
मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र.१७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश व्हॉट्सअपद्वारे पसरविला जात असल्याचे आढळून येत आहे. असे निवडणूक प्रक्रियेविषयक चुकीचे संदेश, अफवा पसरविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिला आहे.
मतदान यादीत नाव नसल्यास फॉर्म क्र.१७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याच्या संदेश मोबाईलद्वारे पसरविण्यात येत आहे. फॉर्म क्र. १७ हा दहावी, बारावीच्या परीक्षेस बाह्यरित्या प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत अशा दिशाभूल करणाऱ्या संदेशामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून नागरिक व प्रशासन अशा दोघांना विनाकारण त्रासाला सामारे जावे लागत आहे. असे संदेश जिल्ह्यात पसरविले जात असल्याचे निदर्शनास आले असून दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध रहावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार नोंदणीबाबत विशेष संक्षिप्त मोहीम २०२४ अंतर्गत मतदार नोंदणी, वगळणी व दुरुस्तीबाबत सर्व विधानसभा मतदार संघात गेली वर्षभर काम करण्यात आले असून त्यानुसार मतदार याद्या अद्ययावत करण्यात आल्या आहेत. मतदाराचे नाव वगळणी करताना नियमानुसार सर्व कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप संदेशाद्वारे प्रसारीत केलेली माहिती अत्यंत चुकीची आहे.
मतदार यादीत नाव नसेल तर संबंधितास मतदान करता येणार नाही. मतदार यादीत नाव असल्यास मतदार ओळखपत्र किंवा भारत निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या १२ पुराव्यापैकी एक दाखवून मतदान करता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.