बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्रीच्या आवारात मराठा दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मंत्री आशिष शेलार. व्यासपीठावर ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, शीतल मालुसरे. Pudhari File Photo
Published on
:
05 Feb 2025, 1:00 am
Updated on
:
05 Feb 2025, 1:00 am
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा केवळ भारतात नव्हे, तर जगात प्रसिद्ध आहे. घरचे मंगल कार्य सोडून नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला सर केला. तो दिवस म्हणजे 4 फेब्रुवारी. हा दिवस सैन्यात ‘मराठा दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठा हे बलिदानाचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले.
मराठा लाईट इन्फंट्री मुख्यालयात मंगळवारी (दि. 4) आयोजित ‘मराठा दिन’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने शेलार बोलत होते. तानाजी मालुसरे यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांची प्रतिमा असलेल्या टपाल तिकिटाचे अनावरण या सोहळ्यात झाले. शेलार पुढे म्हणाले, कमी शिपाई घेऊन चपळतेने शत्रूवर विजय मिळवला म्हणून लाईट इन्फंट्री असे नाव मिळाले. ‘गड आला, पण सिंह गेला’ असे शब्द छत्रपती शिवाजी महाराजांनी उच्चारले, तेव्हापासून कोंढाणा किल्ला ‘सिंहगड’ या नावाने ओळखला जाऊ लागला. हा पराक्रम केवळ मराठाच करू शकले. व्यासपीठावर ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, नरवीर तानाजी मालुसरेंच्या वंशज शीतल मालुसरे, धारवाड पोस्ट खात्याच्या बी. तारा, सांस्कृतिक कार्यविभागाचे संचालक विभीषण चवरे उपस्थित होते. यानिमित्त शिवगर्जना नाटकाचे संचालक स्वप्निल यादव, शिवकालीन शस्त्रांचे संग्रहक अवधूत गांधी, मैदानी खेळ गाजवणारी रुद्रानी वैद्य हिचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. ब्रिगेडिअर मुखर्जी यांनीही मराठ्यांचा इतिहास उलगडून सांगितला. सोहळ्याला मराठा लाईट इन्फंट्रीचे आजी-माजी जवान आणि अधिकारी उपस्थित होते.
नरवीर तानाजी मालुसरेंवर टपाल तिकीट
स्वतःचा मुलगा रायबा याचे लग्न लांबणीवर टाकून शिवरायांचे सेनापती तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ल्यावर स्वारी करण्यास निघाले होते. तेव्हा त्यांनी उच्चारलेले शब्द होते, ‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग आमच्या रायबाचे.’ या नरवीराला कोंढाण्यावर वीरमरण आले. तरीही मराठ्यांनी कोंढाणा जिंकलाचा. त्याचेे प्रतीक म्हणून मंगळवारी (दि. 4) टपाल खात्यातर्फे नरवीर तानाजी मालुसरेंवर टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले.