मराठीला अभिजात भाषेचा दर्जा:पण मराठीची उत्पत्ती कशी झाली? तिचे मूळ कोणते? उत्पत्तीविषयी काय आहेत मतमतांतरे? वाचा

2 hours ago 1
कोणत्याही भाषेचा जन्मकाळ शोधणे महाकठीण काम आहे. कारण, भाषा सतत गतिमान व परिवर्तनशील असते. ती सतत बदलते. तिच्या रुपात सतत बदल होतो. नदी जशी वळसे घेत जाते तशी भाषा देखील अनेक कारणांनी बदलत असते. आपण आज जी भाषा बोलतो तिच्यातील काही शब्द, त्यांचे अर्थ यामध्ये कालानुरुप परिवर्तन झालेले असते. पण हे परिवर्तन अतिशय संथ गतीने होत असल्यामुळे ते आपल्या लक्षात येत नाही. पण एखाद्या भाषेची उत्पत्ती कशी झाली? किंवा तिचे मूळ कोणते? हे अभ्यासाने शोधता येते. पण आपल्या मायबोली मराठी भाषेच्या उत्पत्तीचा विचार करताना तिच्या उत्पत्तीविषयी विविध मतमतांतरे आहेत हे आपल्या प्रामुख्याने लक्षात येते. केंद्र सरकारने अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील तब्बल 12 कोटी जनतेसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. चला तर मग मराठी भाषेची उत्पत्ती कशी झाली? व याविषयी काय मतमतांतरे आहेत? याचा आढावा घेऊया... 'महाराष्ट्र' या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली? मराठीचा जन्म कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी आपण 'महाराष्ट्र' या शब्दाची व्युत्पत्ती पाहूया. इ.स. 500 च्या सुमारास लिहिलेल्या 'महावंस' या बौद्ध ग्रंथात महाराष्ट्राचा उल्लेख 'महारट्ट' असा केला आहे. डॉक्टर ओप्पर्ट यांच्या मते, महाराष्ट्राला पूर्वी 'मल्लराष्ट्र' असे म्हणत. 'मल्ल >म्हार >मार' अशी रुपपरंपरा ते सांगतात. खंडोबा या महाराष्ट्राच्या कुलदैवताचे दुसरे नाव 'मल्हारी' आहे. मणिमल्लाचा वध करणारा 'मल्ल +अरि=मल्हारी' हा लोककथेचा संदर्भ याला पुष्टी देतो. राजारामशास्त्री भागवत यांनी 'मरहट्ट्' हा शब्द 'मरता तव हटता' या अर्थाने घेतला असून, 'जो शत्रूला पाठ दाखवित नाही' असा वीर पुरुष अशी व्युत्पत्ती आहे. शं. बा. जोशी यांच्या मते, महाराष्ट्रात पूर्वी 'हट्टी' किंवा 'हाट' लोकाची वस्ती होती. 'मर =झाडी' आणि 'हट्टी = हाट' जातीचे लोक. यापासून 'मरहट्ट' म्हणजे 'हाट लोकांचा झाडीयुक्त देश' असा सिद्धांत त्यांनी मांडला. यादवकाळात बहुतेक मराठी भाषिक मात्र एकत्र आला आणि त्याचा उल्लेख महाराष्ट्र असा होऊ लागला. म. म. काणे यांनी 'महान राष्ट्र ते महाराष्ट्र' अशी उत्पत्ती मांडली. मराठीची उत्पत्ती केव्हा अन् कशी झाली? मराठीची उत्पत्ती कोणत्या भाषेपासून झाली? याविषयी अनेक मतप्रवाह आहेत. त्यासंदर्भात वैदिक भाषा, संस्कृत भाषा, पाली भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, महाराष्ट्री अपभ्रंश इ. भाषांचे दावे पुढे करण्यात येतात. मराठीची जनकभाषा तिला कालदृष्ट्या निकटची असली पाहिजे. ती केवळ शब्दसंग्रहापुरती मर्यादित नसून तिच्यात ध्वनिप्रक्रिया उच्चारण प्रक्रिया व्याकरण शब्दसंग्रह इत्यादी बाबी मराठीला जवळच्या असल्या पाहिजेत या निकषांवर महाराष्ट्री अपभ्रंश हीच मराठीची साक्षात जनकभाषा ठरते. वरील भाषांखेरीज तमिळ, कन्नड इ. अन्य प्रान्तीय भाषांशीही मराठीचे नाते सांगण्यात आले आहे. पण हे साम्य काही शब्दांपुरतेच मर्यादित असल्याने त्यांना मराठीच्या जनकत्वाचा मान मिळणे शक्य नाही महाराष्ट्री अपभ्रंश हीच मराठीची साक्षात जननी आहे असे डॉ. शं.गो. तुळपुळे यांनी साधार सिद्ध केले आहे. इ. स. 500-700 वर्षांपासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यांतून उत्क्रांत होत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले. हे वाक्य शके 905 मधील असून ‘श्री चामुण्डेराये करविले’ असे आहे. त्यानंतर मुकुंदराज व ज्ञानेश्वर हे सर्वमान्य आद्य मराठी कवी मराठीची वैशिष्ट्ये तिच्या सामर्थ्यासह मांडताना दिसतात. शके 1110 मधील मुकुंदराजांनी रचलेला 'विवेकसिंधु' हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरांनी ‘परि अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरेचि रसिके मेळविन।’ अशा शब्दात मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असे म्हटले आहे. भगवद्‌गीता सर्वसामान्यांना समजावी, यासाठी ज्ञानेश्वरी वा भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन मराठीत केले. त्याचप्रमाणे श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेले 'लीळाचरित्र' म्हणजे मराठीतील पहिला मराठी पद्य चरित्रग्रंथ होय. तेव्हापासून पद्यलेखनाची परंपरा सुरू झाली. 13 व्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक श्रेष्ठ ग्रंथांची निर्मिती झाली. याचा अर्थ मराठी भाषा त्या काळात चांगलीच परिपूर्ण व प्रगल्भावस्थेत होती. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी साहजिकच 300 -400 वर्षांच्या काळ लागला पाहिजे. तत्पूर्वी, इ. स. 1129 मध्ये चालुक्य नृप सोमेश्वराने लिहिलेल्या ग्रंथात `मानसोल्लास` अथवा `अभिलषितार्थ चिंतामणी` या ग्रंथात महाराष्ट्रातील स्त्रिया कांडताना ज्या ओव्या म्हणत असत त्या उद्‌धृत केल्या आहेत. यावरुन 12 व्या शतकाच्या पूर्वार्धात अशा प्रकारचे लोकवाड्मय निर्माण होत होते असा निष्कर्ष निघतो. शिलालेख व ताम्रपटासारख्या कोरीव लेखांची परंपरा मराठीला आणखी मागच्या काळात नेऊन सोडते. इ. स. 983 चा श्रवणबेळगोळचा (कर्नाटक) शिलालेख हा इ.स.1095 चा असावा असे आता प्रस्थापित झाले. त्यामु्ळे तत्पूर्वी इ.स.1060 साली सापडेला दिवे आगरचा ताम्रपट हा मराठीतील आद्य कोरीव लेख ठरतो. यावरून ज्ञानेश्वरीच्या अगोदर जवळपास 300 वर्षे मागे मराठीचे अस्तित्व दिसते. तत्पूर्वी, इ. स. 778 मधील उद्योतनसूरीच्या 'कुवलयमाला' या ग्रंथात मराठे व त्यांची भाषा याचे वर्णन आले आहे. 'दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य / दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे //' असा हा उल्लेख आहे. त्यामुळे मराठीचा उत्पत्तीकाल हा 8 वे शतक असावे असे मानले जाते. मराठीच्या उत्पत्तीविषयकची मतमतांतरे कोणतीही भाषा सतत परिवर्तनशील असते. तिच्यात हळूहळू होणाऱ्या बदलांची अनेक कारणे असतात. मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयीही अनेक मतमतांतरे आहेत. प्र. रा. देशमुख यांच्या मते, आर्यांची मूळ भाषा प्राकृत म्हणजे बोलीच होती. आर्यापूर्वी सिंधू संस्कृतीच्या लोकांच्या मूळ बोलींशी मराठीचा संबंध त्यांनी जोडला. या मतात तथ्य असण्याची शक्यता आहे. कारण, वेदपूर्वकालीन बोलीभाषाच नंतरच्या काळात प्राकृत भाषा बनल्या. इतिहास संशोधक वि. का. राजवाडे यांच्या मते, संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे. आर्येतरांचे त्रैवर्णिक आर्यांवर परिणाम झाल्यामुळे संस्कृत भाषा भ्रष्ट झाली आणि त्रैवर्णिक आर्या व शूत्र स्त्रिया यांच्या परस्परसंबंधांतून ही भ्रष्टता वाढीस लागली. मराठीतील जवळपास 70% शब्दसंग्रह संस्कृतनिष्ठ आहेत. भावे प्रयोगातील क्रियापदे तृतीयपुरुषी एकवचनी ठेवण्याची पद्धत संस्कृतमधील आहे. पण उच्चारप्रक्रिया, प्रयोग, वाक्प्रचार, विभक्तिप्रत्यय, वाक्यरचना आदी बाबतीत मराठी भाषा संस्कृतपासून निर्माण झाली, राजवाडे यांचे मत अशास्त्रीय स्वरुपाचे आहे. कृ. पां. कुलकर्णी यांच्या मते, मराठी अमुक एका भाषेपासून उत्पन्न झाली नसून, संस्कृत, सर्व प्राकृत भाषा, अपभ्रंश या भाषांनी तिच्या जन्मास हातभार लावलेला दिसतो. त्यांच्या मते, यादव मराठीने आख्यातविभक्ती हे प्रकरण संपूर्णपणे महाराष्ट्री प्राक-तातून घेतले. रा. भि. जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे, मराठी भाषा पाली या प्राकृतापासून निर्माण झाली. यावरून मराठी भाषेवर संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश व इतर द्रविडी भाषांचा संस्कार झालेला आहे. त्यामुळे कोणतीही एक भाषा मराठीची जननी आहे असे मानने गैर आहे. शं. गो. तुळपुळे यांचे मत सार्थ ठरते थोडक्यात मराठीच्या उत्पत्तीविषयी विविध मतमतांतरे आढळतात. लोकसाहित्य, प्राचीन ग्रंथ, शिलालेख, ताम्रपट आदी साधने मराठीच्या उत्पत्तीविषयक संशोधनात महत्त्वाचे कार्य करतात. महान राष्ट्र ते महाराष्ट्र ही म. म. काणे यांची महाराष्ट्र शब्दाविषयीची उत्पत्ती महत्त्वाची आहे. सर्वात प्राचीन ग्रंथ 'विवेकसिंधु' हा मानला जात असला, तरी इ. स. 778 मधील 'कुवलयमाला' या ग्रंथात मराठीचा सर्वात जुना उल्लेख आढळतो. श्रवणबेळगोळचा शिलालेख आद्य शिलालेख म्हणून ओळखला जातो. पण मराठीची पहिली लिखित निशाणी अक्षी येथील इ.स. 1012 च्या शिलालेखात सापडते. तसेच इ.स.1060 मधील दिवेआगर येथील ताम्रपट मराठीतील पहिली कोरीव लेख ठरतो. महाराष्ट्री अपभ्रंशापासून मराठीची निर्मिती झाली असे मानले तरी संस्कृतीकरणाचा संस्कार होऊन झालेला उत्क्रांत स्वरुपातील तो अपभ्रंश आहे हे शं. गो. तुळपुळे यांचे मत सार्थ ठरते. मराठी इसवी सन पूर्वीपासून अस्तित्वात? प्रा. हरी नरके यांनी नव्याने मांडलेल्या सिद्धांतानुसार, मराठी ही इसवी सनाच्या पूर्वीपासून असलेली भाषा आहे. त्यांच्या मते, महाराष्ट्री उर्फ प्राचीन मऱ्हाठी. तिच्यापासून शौरसेनी निघाली. शौरसेनीपासून कालांतराने मागधी व पैशाची या दोन भाषा निघाल्या. तेव्हा मागधी व पैशाची ही दोन्ही प्राचीन मराठीची नातवंडे होत. शौरसेनीची खरी आई म्हणजे प्राचीन मऱ्हाठी भाषा. हालाच्या सप्तशतीतील काव्यही लोकवाङ्मय आहे. कुठल्यातरी राज्याच्या राजकवीने केलेले ते काव्य नसून महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या लोकप्रिय काव्याचे ते संकलन आहे. त्यात राजांच्या दरबाराचे चित्र नसून गावगाड्याचे, पाटलाचे, पाटलाच्या सुनेचे म्हणजेच महाराष्ट्राच्या साध्या ग्रामीण जीवनाचे चित्र पाहायला मिळते. लीलावती ही अद्भुतरम्य कथा हाल या राजाबद्दल आहे. त्यातही महाराष्ट्राचा प्राण जे प्रतिष्ठान नगर(पैठण) व तेथील गोला उर्फ गोदावरी नदी व तीत नाहणाऱ्या, अंगाला हळद फासणाऱ्या महाराष्ट्र सुंदरीचे वर्णन आढळते. हा कवी आपल्या भाषेला 'मरहठ्ठ देसी भाषा' असे नाव देतो. दुर्गा भागवतांनी राजारामशास्त्री भागवतांच्या संशोधनाचा निष्कर्ष सांगताना म्हणले आहे, की जुनी माहाराष्ट्री संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखवले आहे. यावरून महाराष्ट्री भाषा ही किमान अडीच हजार वर्षे जुनी, म्हणजे इसवी सनाच्या आधीच्या पाचव्या शतकाइतकी जुनी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. म्हणजे ती कन्नड आणि तेलुगू यांच्यापेक्षा जास्त जुनी किंवा निदान तितकीच जुनी असली पाहिजे. पठारे समितीचा मराठीचे वय 2500 वर्षे असल्याचा दावा मराठी भाषेच्या अभिजात दर्जाविषयी संशोधन करून तसा अहवाल केंद्राला सादर करण्यासाठी 2012 मध्ये प्रा. रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वात एक समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने 2013 मध्ये आपला अहवाल सादर केला. त्यात महारट्ठी - महरट्ठी - मऱ्हाटी - मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असा दावा करण्यात आला. महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती. त्यामुळे मराठीचे वय किमान 2500 वर्षे असावे असे पुरावे आहेत, असा दावा या अहवालात करण्यात आला होता. 11 कोटी लोकांची बोलीभाषा असणारी मराठी ही जगातील 10 व्या ते 15 व्या क्रमांकाची भाषा आहे. याशिवाय देशातील ती एक महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे. तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचे अभिजातपण स्वयंसिद्ध आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार केंद्राने आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. 1965 मध्ये मिळाला राजभाषेचा दर्जा भारतीय राज्यघटनेतील 22 अधिकृत भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे. महाराष्ट्राची मायबोली मराठी असल्याने महाराष्ट्र दिनानिमित्त 'मराठी राजभाषा दिन' अर्थात 'मराठी भाषा दिन' 1 मे रोजी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय वसंतराव नाईक सरकारने घेतला होता. या सरकारने 'मराठी राजभाषा अधिनियम 1964' हा कायदा 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला. या अधिनियमानुसार, महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर 1966 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. मराठीला राजभाषेचा दर्जा देऊन वसंतराव नाईक सरकारने एकप्रकारे मराठीचा ऐतिहासिक गौरव केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article