माजी आ. वैभव नाईकpudhari photo
Published on
:
05 Feb 2025, 1:20 am
Updated on
:
05 Feb 2025, 1:20 am
कणकवली ः उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे माजी आ. वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी सौ. स्नेहा नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) मार्फत पुन्हा एकदा संपत्तीच्या चौकशीची नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस रत्नागिरीचे पोलिस उपनिरीक्षक अविनाश पाटील यांनी दिली. तसेच नाईक यांच्या उघड चौकशी कामी मालमत्ता आणि उत्पन्नाच्या परिपूर्ण माहितीसह आवश्यक कागदपत्रांसह 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत नोटीस पाठवली आहे.
डिसेंबर 2022 मध्ये माजी आ. वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने चौकशीसाठी पहिली नोटीस बजावली होती. त्या उघड चौकशीच्या अनुषंगाने वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी सौ. स्नेहा नाईक या त्यावेळी चौकशीसाठी एसीबीच्या रत्नागिरी कार्यालयात उपस्थित राहिल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या लोकप्रतिनिधी कालावधीत मालमत्ता, उत्पन्न व खर्च परिपूर्ण माहिती मागवून सादर करणार असल्याचे सांगितल्याने तसा प्राथमिक स्वरुपातील त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.
त्यानंतर मत्ता व दायित्वाचे 1 ते 6 फॉर्ममधील माहिती व आवश्यक कागदपत्रांसह 3 जानेवारी 2023 आणि 28 जून 2023 रोजी त्यांना उपस्थित राहण्याबाबत एसीबीकडून कळवण्यात आले होते. मात्र, त्यावेळी वैभव नाईक हे उपस्थित न राहता 28 जून 2023 त्यांनी आपले अकाऊंटंट अमोल केरकर यांना पाठवले होते. परंतू त्यांनी आणलेली कागदपत्रे परिपूर्ण नसल्याने ती न देता काही कालावधीनंतर वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सदरची कागदपत्रे हजर करू असे पत्र श्री. केरकर यांनी एसीबीला दिले होते. मात्र अद्यापपर्यंत त्या कागदपत्रांची पुर्तता झाली नसल्याने वैभव नाईक यांच्या मालमत्तेच्या उघड चौकशीच्या अनुषंगाने पुन्हा ही नोटीस बजावल्याचे एसीबीने नोटीसीत म्हटले आहे.
याबाबत नोटीसीत पुढे म्हटले आहे की, वैभव नाईक यांनी स्वतःचे तसेच पत्नी सौ. स्नेहा तसेच एचयूएफ व नाईक स्टोन इंडस्ट्रीज यांचे दिनांक 1 जानेवारी 2002 ते 29 सप्टेंबर 2022 या कालावधीतील उत्पन्न, खर्च व मालमत्ता याबाबतची आवश्यकती परिपूर्ण माहिती 1 ते 6 फॉर्ममध्ये भरून द्यावी तसेच सदर कालावधीत आयकर विवरण पत्रे, ऑडिट रिपोर्ट, कॉम्प्युटेशन ऑफ इनकम, शेडयुल बॅलन्सशिट, प्रॉफिट अॅण्ड लॉस अकाऊंट डिटेल्स शेडयुल्स त्या संबंधित कागदपत्रांसहित सकाळी 11 वा. एसीबीच्या रत्नागिरी येथील कार्यालयात उपस्थित राहावे असे वैभव नाईक यांना पाठवलेल्या नोटीसीत एसीबीने म्हटले आहे.
तर वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा नाईक यांना पाठवलेल्या नोटीसीत आपले पती वैभव नाईक यांच्या मालमत्तेची चौकशी चालू आहे. सदर उघड चौकशीच्या अनुषंगाने 5 डिसेंबर 2022 रोजी आपण या कार्यालयात उपस्थित राहिलात त्यावेळी आपला जबाब नोंदविण्यात आला. मात्र त्यावेळी आपल्याकडे आपल्या नावे असलेली मालमत्ता, व्यवसाय, उत्पन्न आणि खर्च याबाबत सविस्तर माहिती व कागदपत्र नसल्याने सदर बाबत माहिती नंतर सादर करेन, असा जबाब आपण या कार्यालयाकडे नोंदवला आहे. तरी वैभव नाईक यांच्याशी सन 2004 मध्ये आपला विवाह झाल्यानंतर दिनांक 29 सप्टेंबर 2022 या कालावधीत उत्पन्न, खर्च व मालमत्ता याबाबतची परिपूर्ण माहिती तसेच सदर कालावधीतील आयकर विवरण पत्रे व त्यासंबंधित आवश्यक कागदपत्रांसह आपण दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. एसीबीच्या रत्नागिरी कार्यालयात उपस्थित राहावे असे सौ. स्नेहा नाईक यांना दिलेल्या नोटीसीत एसीबीने म्हटले आहे.
दबावाला बळी पडणार नाही, पक्षाशी एकनिष्ठच
माजी आ. वैभव नाईक यांनी नोटिसीबाबत प्रतिक्रिया देताना गेल्या दोन वर्षांपासून आपल्या मालमत्तेच्या अनुषंगाने एसीबीकडून चौकशी सुरू आहे. एसीबीने मागवलेल्या 20 वर्षांतील मालमत्ता व उत्पन्नाबाबत सर्व माहिती आपण दिलेली होती. अलीकडच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातही ती माहिती दिली होती, तरीही त्यांना जी काही माहिती आवश्यक आहे, ती देण्याचा आपण प्रयत्न करेन. मात्र, कोणत्याही राजकीय दबावाला आपण बळी पडणार नाही. आपण आपल्या पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे वैभव नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सत्ताधार्यांकडून आपल्याला कुठली ऑफर आहे का? या प्रश्नावरही त्यांनी आपल्याला कुठलीही ऑफर कोणीही दिलेली नाही. आपण पक्षाशी पूर्वीही एकनिष्ठ होतो आणि यापुढेही पक्षाचे निष्ठेने काम करणार आहे. यापूर्वी काही जणांना ईडी आणि एसीबीच्या नोटीसा मिळाल्यानंतर त्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला होता याकडे वैभव नाईक यांचे लक्ष वेधले असता कुठल्याही चुकीच्या पद्धतीच्या दबावाला आपण बळी पडणार नाही असे ते म्हणाले. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरची चर्चा आहे, याकडे लक्ष वेधले असता ऑपरेशन टायगर ऐवजी ऑपरेशन गद्दार असे नाव ठेवले असते तर बरे झाले असते. ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली तेच इतरांना पक्षातून बाहेर पडण्यासाठी दबाव आणत आहेत. मात्र त्यांनी असले राजकारण करण्यापेक्षा जनतेला जी आश्वासने दिली आहेत ती आधी पूर्ण करावीत. आज मोठ्या प्रमाणात ठेकेदारांची देयके थकीत आहेत, विकासकामे ठप्प आहेत त्याकडे लक्ष दिले तर बरे होईल असे वैभव नाईक म्हणाले.