अभिजित पाटील हे 30,621 इतक्या मताधिक्याने विजयी झाले. Pudhari Photo
Published on
:
24 Nov 2024, 12:38 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:38 am
माढा : माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील हे 30,621 इतक्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांचा व महायुतीच्या उमेदवार मीनल साठे यांचा दणदणीत पराभव केला. अभिजित पाटील यांना 1 लाख 36 हजार 559 मते मिळाली. अपक्ष रणजित शिंदेंना 1 लाख 5 हजार 938, तर मीनल साठेंना 13 हजार 381 इतकी मते मिळाली. पोस्टल मतांमध्ये अभिजित पाटील यांना 250 मतांची आघाडी मिळाली. तीस वर्षे सलग आमदार राहिलेल्या बबनराव शिंदेंसाठी माढ्याचा पराभव हा मोठा धक्का मानला जात आहे.
माढा मतदारसंघासाठी 76 टक्के इतके मतदान झाले होते. 2 लाख 67 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर प्रथमतः माढा तालुक्यातील 78 गावांची मोजणी झाली. यामध्ये रांझणीपासून मोडनिंब व बैरागवाडीपर्यंतच्या गावांत शिंदेंचा असणारा प्रभाव मतदानातून संपुष्टात आल्याचे चित्र स्पष्ट झाले. अभिजित पाटील यांनी माढा तालुक्यातील 78 गावांत रणजित शिंदेंना बरोबरीत रोखल्याचे मतमोजणीच्या माध्यमातून समोर आले. विजयानंतर नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष मतमोजणी केंद्र परिसरात केला. येथून त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. महायुतीच्या उमेदवार मीनल साठे यांना मिळालेली मते पाहता त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचादेखील लाभ मिळाला नाही.
देशाचे नेते शरद पवार आणि राज्याचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे आशीर्वाद आणि मतदार राजाने एका शेतकर्याच्या मुलाला आमदार केले. हा विजय मी त्या शेतकरी राजाला समर्पित करतो, असे सांगत तीस वर्षांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लागला असून, एकहाती सत्ता केंद्रित करणार्या अकर्तृत्ववान पिढीला जनतेने नाकारले.
- अभिजित पाटील, आमदार