मिरजेतून पालकमंत्री सुरेश खाडे पाचव्यांदा विजयी. Pudhari File Photo
Published on
:
24 Nov 2024, 12:01 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:01 am
मिरज : राज्याचे कामगारमंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री व भाजपा-महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे हे 45 हजार 195 इतक्या विक्रमी मताधिक्यांनी विजयी झाले. शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांना पराभव पत्करावा लागला. सुरेश खाडे यांना 1 लाख 29 हजार 766 मते मिळाली, तर तानाजी सातपुते यांना 84 हजार 571 इतकी मते मिळाली.
मिरज विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे सुरेश खाडे व शिवसेनेचे तानाजी सातपुते यांच्यामध्ये जोरात लढत झाली. या निवडणुकीमध्ये एकूण 14 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीमध्ये 2 लाख 28 हजार 875 इतके मतदान झाले होते. येथील वैरण बाजारनजीकच्या शासकीय गोदामामध्ये शनिवारी मतमोजणी पार पडली. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीस टपाली मतांची मोजणी झाली. 20 टेबलांवर ईव्हीएमच्या एकूण 16 फेर्या झाल्या. पहिल्या फेरीपासूनच सुरेश खाडे आघाडीवर होते. पहिल्या फेरीतच सुरेश खाडे यांनी 4683 मतांची आघाडी घेतली होती. ही आघाडी त्यांनी कायम पुढे ठेवली. सातव्या फेरीअखेर सुरेश खाडे यांचे मताधिक्य कायम होते. आठव्या फेरीमध्ये सुरेश खाडेंपेक्षा तानाजी सातपुते यांना 1179 मते जास्त मिळाली. त्यानंतर अकराव्या फेरीमध्ये पुन्हा तानाजी सातपुते यांना सुरेश खाडे यांच्यापेक्षा 6815 मते जास्त मिळाली. मात्र खाडे यांचे लीड सातपुते यांना तोडता आले नाही. सोळाव्या फेरीअखेर सुरेश खाडे यांना 1 लाख 28 हजार 68 मते मिळाली, तर तानाजी सातपुते यांना 83 हजार 789 मते मिळाली. टपाली मतदानाच्या मोजणीनंतर खाडे यांना 1,29,766, तर सातपुते यांना 84,571 इतकी मते मिळाली.
जिल्ह्यात सलग पाचव्यांदा कमळ फुलवले
सुरेश खाडे यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा जत विधानसभा मतदारसंघात विजयी होऊन भाजपचे कमळ फुलवले होते. त्यानंतर त्यांनी 2009 पासून सलग तीनवेळा मिरजेत कमळ फुलवले. आता 2024 मध्ये ते पुन्हा मिरजेतून चौथ्यांदा भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाले. ते मिरजेतून चौथ्यांदा आणि जत येथून एकदा असे सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत.