दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा मोठा पराभव झाला आहे. चौथ्यांदा सत्तेत येण्याचं केजरीवाल यांचं स्वप्न भंगलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पाठोपाठ केजरीवाल यांचे एकेकाळचे सहकारी कुमार विश्वास यांनीही टीका केली आहे. तर, कुमार यांनी भाजपचं अभिनंदन केलं आहे. भाजप सत्तेत आली आहे. दिल्लीतील मतदारांच्या आशा, आकांक्षा भाजप पूर्ण करेल ही अपेक्षा करतो. तसेच मी भाजपचं या विजयाबद्दल अभिनंदन करतो, असं कुमार विश्वास यांनी म्हटलं आहे.
कुमार विश्वास यांनी एका न्यूज एजन्सीशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. जेव्हा मनीष सिसोदिया दिल्लीच्या जंगपुरा येथून पराभूत झाल्याची बातमी आली तेव्हा माझी अराजनितीक बायको रडायला लागली. कारण मनीषने तिला म्हटलं होतं की आता ताकद आहे. त्यावर तिने, दादा, ताकद कायम राहत नाही, असं म्हटलं होतं. आता मी त्यांना गीता पाठवणार आहे, असं कुमार विश्वास म्हणाले.
दिल्ली मुक्त झाली, आज न्याय मिळाला
यावेळी कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर त्यांचं नाव न घेता टीका केली आहे. मला त्या माणसाबद्दल काहीच सहानुभूती नाही. त्याने आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी अण्णा आंदोलनातून आलेल्या लाखो कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचा चकनाचूर केला. दिल्ली आता त्याच्यापासून मुक्त झाली आहे. त्याने आपच्या कार्यकर्त्यांचा वापर केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी केला आहे. आज न्याय मिळाला आहे, असं कुमार विश्वास म्हणाले.
त्याच्याकडून अपेक्षा नको
माझ्यासाठी हा व्यक्तिगत आनंदाचा किंवा दु:खाचाही विषय नाही. न्याय झाला याचचं समाधान आहे. आता इतर लोकं आणि बाकी पक्ष यातून धडा घेतील ही आशा आहे. सत्ता मिळवण्यासाठी आता कुणीही अहंकारी होणार नाही, ही अपेक्षा आहे. दिल्लीच्या नागरिकांना चांगल्या शासनासाठी अभिनंदन करतो. भाजपने आपल्या नेतृत्वात सरकार बनवून गेल्या दहा वर्षातील दिल्लीतील जे दु:ख होते ते दूर करावं. आपच्या कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे की, तुम्ही सर्व काही माहीत असताना फायद्यासाठी किंवा लालसेपोटी एका अशा व्यक्तीचं समर्थन केलंय की ज्याने मित्रांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. आपल्या गुरूची फसवणूक केली होती. आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना घरी आणून मारहाण केली होती. आता या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवणं सोडून द्या. आपआपल्या आयुष्याकडे बघा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
15 वर्षापासून एकही आमदार नाही
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा पराभव झाला आहे. तब्बल 27 वर्षानंतर भाजप सत्तेत आला आहे. दिल्ली विधानसभेच्या2 एकूण 70 जागा आहेत. त्यापैकी भाजपला 48 तर आपला 22 जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसला दिल्लीत खातंही उघडता आलेलं नाहीये. सलग तिसऱ्यांदा काँग्रेसला दिल्लीत खातंही उघडता आलेलं नाही. म्हणजे गेल्या 15 वर्षापासून दिल्लीत काँग्रेसचा एकही आमदार नाहीये. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल, मनीष सोसिदिया, सोमनाथ भारती, दुर्गेश पाठक, सत्येंद्र जैन सारखे आपचे नेते पराभूत झाले आहेत. तर मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांना विजयासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला आहे.