Published on
:
18 Jan 2025, 6:18 am
Updated on
:
18 Jan 2025, 6:18 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - "मुक्काम पोस्ट देवाचं घर" येत्या ३१ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मनीष कुमार जायसवाल आणि मंगेश देसाई यांनी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. कीमाया प्रॉडक्शनचे महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते असून त्यांची ही पहिलीच निर्मिति आहे तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन केले आहे. या चित्रपटात मायरा वायकूळ, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन, सविता मालपेकर, उषा नाडकर्णी यांच्या मध्यवर्ती भूमिका चित्रपटात पहायला मिळणार आहेत.
या बहुचर्चित चित्रपटातलं "सुंदर परीवानी..." हे गाणं सिनेरसिकांच्या पसंतीस उतरले आहे. "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या चित्रपटातून एक हृदयस्पर्शी गोष्ट सांगण्यात आली आहे. एका लहान मुलीच्या दृष्टिकोनातून तिच्या शोधाचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. "सुंदर परीवानी, करून वेनीफनी दिसाया हवं झगामगा.. असे छान, सोपे शब्द असलेल्या या गाण्यात एका मुलीच्या भावभावनांचं चित्रण करण्यात आलं आहे. गावात राहणाऱ्या या मुलीचं घर, तिच्या घरातलं वातावरण, शाळा, मैत्रिणींबरोबरचं तिचं खेळणं यातून तिच्या भावविश्वाचा वेध घेण्यात आला आहे. चिनार – महेश यांनी संगीत दिलेल्या या गाण्याचं लेखन मंगेश कांगणे यांनी केलं आहे. तर स्वरा बनसोडे या गायिकेनं हे गाणं गायलं आहे.