Published on
:
25 Nov 2024, 11:38 pm
Updated on
:
25 Nov 2024, 11:38 pm
कोल्हापूर : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्याचा बडगा उगारताच शहर, जिल्ह्यातून पसार झालेल्या आणि कुख्यात बोडके-केदार टोळीतील सराईत गुंड विकास ऊर्फ चिक्या बंडोपंत भिऊंगडे (वय 33, रा. दुर्गामाता मंदिरजवळ, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) याला जुना राजवाडा पोलिसांनी पुणे जिल्ह्यात उरळी कांचन (ता. हवेली) येथे सापळा रचून जेरबंद करण्यात आले. तो दीड वर्षापासून फरार होता. हवेली तालुक्यात तो साई पाटील नावाने वावरत होता.
भिऊंगडेला बंदोबस्तात सोमवारी सकाळी कोल्हापुरात आणले. दुपारी त्यास न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास 28 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली. त्याच्याविरुद्ध मारामारीसह दहशत माजविल्याप्रकरणी चार गुन्हे नोंद असल्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले. कुख्यात बोडके-केदार टोळीतील भिऊंगडे हा सराईत गुन्हेगार आहे. प्रकाश बोडके याच्यावरील खुनीहल्ल्याच्या प्रकारानंतर भिऊंगडेसह टोळीतील दहा साथीदारांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी टोळीतील 8 जणांना अटक केली. मात्र, भिऊंगडेसह त्याचा साथीदार राजू बोडेकर हे दोघे मे 2023 पासून पोलिसांना चकवा देत होते.
विकास ऊर्फ चिक्या भिऊंगडेसह फरारी साथीदाराचा कोल्हापूर जिल्ह्यासह मुंबई, पुणे, बेळगावसह गोव्यातही शोध घेण्यात येत होता. मात्र, संशयित पोलिसांच्या हाताला लागत नव्हते. भिऊंगडेचे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात उरळी कांचन परिसरात वास्तव्य असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे, हवालदार प्रशांत घोलप यांना मिळाली. जुना राजवाडा पोलिसांनी वेशांतर करून संशयिताचा हवेली तालुक्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला. उरळी कांचन येथील एका पूर्वाश्रमीच्या गुन्हेगाराकडे त्याचे वास्तव्य होते, अशी माहिती पथकाला मिळाली. साई पाटील या नावाने तो परिसरात वावरत होता. पथकाने सापळा रचून भिऊंगडेला ताब्यात घेतले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याची चौकशी केली. चौकशीअंती त्याने कोल्हापूरसह परिसरातील गुन्हेगारी कारनाम्यांची कबुली दिली, असेही उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी सांगितले. शोध पथकात सागर डोंगरे, सतीश बांबरे, प्रवीण सावंत, प्रशांत पांडव आदींचा समावेश होता.