या देशात याकूब मेमनच्या दफनासाठी जागा मिळते, पण अक्षयला… आरोपीच्या वकिलाची खदखद काय?

2 hours ago 1

बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी एन्काऊंटरमध्ये मारला गेलेल्या अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी मिळेनासी झाली आहे. बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषदांनी स्मशानभूमीत दफन करण्यास मनाई केली आहे. तर, कोर्टाने येत्या सोमवारपर्यंत अक्षयवर अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले आहेत. पण स्मशानभूमीच मिळत नसल्याने पंचाईत झाली आहे. या पार्श्वभूमीवर अक्षयचे वकील अमित कटारनवरे यांनी खदखद व्यक्त केली आहे. या देशात दहशतवादी याकूब मेमनचं दफन करण्यासाठी जागा मिळते. पण गुन्हा सिद्ध झालेला नसतानाही अक्षयच्या दफनविधीसाठी जागा मिळत नाही, अशी खदखद कटारनवरे यांनी व्यक्त केली आहे.

वकील अमित कटारनवरे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. आज मी काहीच सांगणार नाही. परत परत तेच प्रश्न नको प्लीज? अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होईल म्हणून पत्रकार दिवसभर थांबून आहेत. मात्र सरकार दफन करण्यासाठी परवानगी देत नाही. दफन करण्यासाठी सरकार जागा देत नाही. मला त्याच्या वाईट वाटते, तुमची मला सहानुभूती आहे. दिवसभर पत्रकार थांबतात मात्र सरकार दफनभूमीसाठी जागा देत नाही. आपल्या देशात सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली तर याकूब मेमन सारख्या व्यक्तीला या देशात जागा मिळते. हेच सरकार असतं. त्याच्या अंत्ययात्रेत अनेक जण येतात. मात्र अक्षयला कुठल्याही न्यायालयाने अद्याप दोषी ठरवलं नाही, तरी देखील त्याला दफनभूमीसाठी जागा मिळत नाही हे पटण्या सारखा आहे का?, असा सवाल अमित कटारनवरे यांनी केला आहे.

तुम्हाला तरी पटतंय का?

अक्षयच्या दफनविधीसाठी सरकारला जागा मिळत नाही हे तुम्हाला तरी वाटतंय का? ही गोष्ट पटण्यासारखी आहे का? अक्षयने गुन्हा केला की नाही केला? आपण हे कसं काय ठरवणार? तुमच्यापैकी कोणी पाहिलं का? त्याच्यावर काय आरोप आहेत याची कागदपत्रे मी स्वतः पाहिले नाही आणि जोपर्यंत मी डॉक्युमेंट पाहत नाही तोपर्यंत काही भाष्य करणं योग्य नाही. खरोखरच जर त्याची बाजू न्यायालया समोर मांडली असती तर सत्य काय ते बाहेर आलं असतं. तो दोषी असता तर त्याला रंगाबिल्लासारखी डबल फाशी दिली असती तरी काय हरकत नव्हती, असं अमित कटारनवरे म्हणाले.

पोलीसराज होऊ देणार नाही?

आमचा लढा पोलीस राज विरोधात आहे. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात पोलीस राज आम्ही कदापि खपवून घेणार नाही. आम्ही सर्व वकील मिळून लढा देऊ. न्यायालयातूनच न्याय मिळाला पाहिजे. पोलीस न्यायाधीश बनतील हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

गरिबांवर हल्ला करणारे मर्द नाही

या एन्काऊंटरमध्ये जखमी झालेल्या पोलिसावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. कोणाला कुठे उपचार घ्यायचे तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी त्यावर भाष्य करणार नाही. मला इतकच म्हणायचे आहे की, समानता असणे गरजेचे आहे. विषमता नको. सगळीकडे समान नजरेने पाहायला पाहिजे. अक्षयच्या आई-वडिलांची कुठली चूक नसतानाही त्याने चांगले संस्कार दिले नाही म्हणून त्यांनी असा गुन्हा केला? त्याने गुन्हा केला हे पोलीसच ठरवणार असतील तर मग अनेक लोकांवर पोलिसांनी आरोप केले आहेत, त्या सर्वांचे एनकाउंटर करणार का? ते गरीब आहेत म्हणून असं होतंय का? छोटा राजनच्या विरोधात असं होईल का? छोटा राजनच्या विरोधात कोणी बोलायची हिम्मत तरी करेल का? गरिबांवरती दादागिरी करणारे मर्द नाहीत, असा हल्लाच त्यांनी चढवला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article