Published on
:
31 Jan 2025, 2:29 pm
Updated on
:
31 Jan 2025, 2:29 pm
नागपूर : पक्षशिस्त मोडली म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधून कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आलेले 4 पदाधिकारी तन्वीर विद्रोही, अक्षय हेटे, अनुराग भोयर तसेच मिथीलेश कान्हेरे यांना तूर्तास अभय मिळणार असल्याची शक्यता आहे. या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत श्रेष्ठींकडे न्यायाची भूमिका मांडली.
आता या प्रकरणात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही दखल घेत दिल्लीमधील राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वतः महाराष्ट्रात येवून यावर मार्ग काढणार असल्याचे आणि दोष नसेल तर कारवाई नको अशी भूमिका मांडणार असल्याचे नाना पटोले यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले. एकंदरीत निर्दोष असलेल्या पदाधिकाऱ्यांना आता पक्षश्रेष्टी मार्फत दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. संघ मुख्यालयावरील आंदोलनाला दांडी मारणाऱ्या आणि यात अनेक नेता पुत्र असलेल्या 60 पदाधिकाऱ्यांना यापूर्वी पदमुक्त करण्यात आले होते. यात शिवानी विजय वडेट्टीवार, केतन विकास ठाकरे, अनुराग सुरेश भोयर, अभिषेक अशोक धवड अशा अनेक नेता पुत्रांचा समावेश होता. मात्र, यातील अनेक नेता पुत्रांना अभयदान देत राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या पदाधिकाऱ्यांवरच कारवाई केल्याचा आरोप पुढे आल्यानंतर आता युवक काँग्रेसमधील नंतरच्या हकालपट्टी कारवाईलाही स्थगिती मिळण्याची चिन्हे आहेत.