बी. वाय. विजयेंद्रPudhari File Photo
Published on
:
05 Feb 2025, 12:54 am
Updated on
:
05 Feb 2025, 12:54 am
नवी दिल्ली : येडियुराप्पापुत्र बी. वाय. विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा आणि भाजप वाचवा, असे आवाहन भाजपमधील बंडखोर गटाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे केले आहे. तसेच पुढचे प्रदेशाध्यक्षपद लिंगायत समुदायाला देणार असाल तर मी स्वतः तयार आहे, असा स्पष्ट संदेश बंडखोरांचे नेते बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी दिला आहे.
यत्नाळ, माजी मंत्री रमेश जारकीहोळी, श्रीमंत पाटील, कुमार बंगारप्पा, अरविंद लिंबावळी आदि नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. मंगळवारी त्यांनी पक्षाध्यक्ष नड्डांची भेट घेऊन परिवार राजकारण संपवण्याचे आवाहन केले. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा हे प्रदेशाध्यक्ष होते. मग त्यांच्या पुत्रालाच प्रदेशाध्यक्षपद का? कर्नाटक भाजपमध्ये दुसरा कोणी सक्षम नेता नाही का, असे प्रश्न यत्नाळ यांनी केले आहेत. भाजपने चार दिवसांपूर्वी कर्नाटकात जिल्हाध्यक्षांची निवड केली. आता नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड लवकरच केली जाणार आहे. पुन्हा ते पद आपल्यालाच मिळेल, असे विजयेंद्र यांनी म्हटले आहे. मात्र यत्नाळ, जारकीहोळ, श्रीमंत पाटील यांच्यासह नाराज नेत्यांचा त्यांना विरोध आहे. त्यामुळे हे पद दुसर्या कुणाही नेत्याकडे द्यावे, अशी मागणी त्यांनी मंगळवारी नड्डांकडे केली.