वेंगुर्ले : सार्व. बांधकाम विभाग अभियंत्यांना रस्ते दुरुस्तीबाबत निवेदन देताना सनी बागकर व अन्य.pudhari photo
Published on
:
26 Nov 2024, 1:00 am
Updated on
:
26 Nov 2024, 1:00 am
वेंगुर्ले ः वेंगुर्ले तालुका मनसे पदाधिकार्यांनी सोमवारी वेंगुर्ले सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला धडक देत अभियंत्यांना तालुक्यातील खराब रस्त्यांबाबत जाब विचारला व कार्यवाहीसाठी निवेदन दिले. याबाबत केलेल्या कार्यवाहीबाबत येत्या आठ दिवसांत लेखी पत्राद्वारे कळविण्यात यावे; अन्यथा ठोस लेखी उत्तर मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
तालुका अध्यक्ष सनी बागकर, महादेव तांडेल, विनायक फटनाईक, सूरज मालवणकर,विभाग अध्यक्ष पवन बागायतकर, शहर उपाध्यक्ष प्रथमेश नाईक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात बोर्डी-ठाणे-न्हावाशेवा-रेवस-विजयदुर्ग-मालवण -शिरोडा रस्ता सुधारणा व डांबरीकरण कामाचा कार्यारंभ आदेश झाला होता. त्यानंतर गेल्या जून महिन्याच्या प्रारंभी ठेकेदाराने सदर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केले होते. मात्र केवळ सात महिन्यातच या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण उखडून गेले आहे व रस्ता खड्डेमय झाला आहे.
या रस्ता कामासाठी चोवीस महिन्याचा जोखीम कालावधी असताना केवळ सात महिन्यात सदर रस्त्याचे काम खराब होणे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा आहे, असे सांगत सदर रस्त्याचे काम करणार्या ठेकेदाराने डांबरीकरण कामाच्या गुणवत्तेबाबत तडजोड केल्याचे आरोप मनसे पदाधिकार्यांनी केला.
या बाबी लक्षात घेता तसेच आत्तापर्यंतच्या रस्ता सुधारणा कामांची कार्यपद्धती व इतिहास पाहता सदोष कार्यपद्धतीमुळे रस्ता वर्षाच्या आतच खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. सदर रस्त्याचे निकृष्ट झालेले काम ठेकेदारामार्फत आपण पुन्हा करून घ्यावे आणि याबाबत आम्हास आपल्या विभागामार्फत केलेल्या कार्यवाहीचे येत्या आठ दिवसांत लेखी पत्राद्वारे कळवावे, अन्यथा कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मनसे कार्यकर्ते आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडतील, असा इशारा सा. बां. च्या अभियंत्यांना देण्यात आला.