राजेंद्र नागवडे यांची खंत:प्रामाणिकपणे ऊसाचे पैसे देऊनही निवडणुकीत दिसले विदारक चित्र
6 hours ago
1
उसाचे पैसे देत नाहीत, कुकडीचे पाणी, रस्त्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात, त्यांना विचारणा होत नाही. मात्र, आम्ही प्रामाणिकपणे उसाचे पैसे देऊनही या निवडणुकीत विदारक चित्र पाहावयास मिळाले. मात्र, आम्ही शेतकरी हिताचे काम करीत राहणार असल्याचे प्रतिपादन नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले. श्रीगोंदे फॅक्टरी येथे गुरुवारी नागवडे साखर कारखान्याचा सुवर्णमहोत्सवी ५० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस होते. बॉयलरची विधिवत पूजा कारखान्याचे संचालक भाऊसाहेब नेटके व मीनाक्षी नेटके, संचालक सावता हिरवे व अरुणा हिरवे यांच्या हस्ते, तर गव्हाण पूजन संचालक बंडू जगताप व अल्पना बंडू जगताप व काटा पूजन संचालक विठ्ठल बापू जंगले व कल्पना जंगले यांच्या हस्ते झाले. नागवडे म्हणाले, की सहकारी साखर कारखाने खासगी होत आहेत. त्यामुळे स्पर्धा वाढत आहे. शेजारील दौंड शुगर, अंबालिका साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढली. आपण त्यांच्या बरोबरीने उसाला भाव देत आहोत. भविष्यकाळ ओळखून सहकार टिकवणे ही सामुहीक जबाबदारी आहे. गेल्या वर्षी ऊस तोडणी मजुरांनी फसवले, त्यामुळे अडचण झाली. यावेळी ऊसतोडणी मजुर व हार्वेस्टर आहेत. नागवडे कारखाना साडेसहा हजार मेट्रिक टन गाळप दररोज करील, असा विश्वास नागवडे यांनी व्यक्त केला. बाबासाहेब भोस म्हणाले, की काहींनी उसाला २९०० रुपये दर देण्याची घोषणा केली आणि प्रत्यक्षात तेवढे पैसे दिले नाही. नागवडे कारखाना ३० हजार सभासदांना साखर देतो, सर्व शेतकऱ्यांच्या उसाला समान भाव देत असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर, डी. आर. काकडे, विश्वनाथ गिरमकर, दिनेश इथापे, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक सुभाष शिंदे यांनी केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)