राज्यात मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ:नाना पटोले यांचा ठाम विश्वास; भाजपकडे कार्यकर्तेच उरले नसल्याचा दावा
2 hours ago
1
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. भाजप पैसा व दारू वाटून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा हा नोट जिहाद आहे की दारू जिहाद आहे? महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे ते म्हणाले. नाना पटोले पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल. मतदानाची आकडेवारी व कल पाहता काँग्रेसचेच सर्वाधिक उमेदवार निवडून येतील. मविआचे सरकार येणार यावर कोणतेही दुमत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. भाजप सरचिटणीस विनोद तावडे हे पैसे वाटताना पकडले गेले. त्यानंतर त्यांनी आपण चिठ्ठ्या वाटण्यासाठी गेल्याचा दावा केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस चिठ्ठ्या वाटत असतील तर ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. यावरून त्यांच्याकडे आता कार्यकर्तेच राहिले नसल्याचे स्पष्ट होते. भाजप घटनात्मक व्यवस्थेला मानत नाही आता हे लोक कितीवेळा खोट्यावर खोटे बोलणार? देवेंद्र फडणवीस यांचे पीए तथा आर्वी विधानसभेचे भाजपचे उमेदवार सुमीत वानखेडे यांच्या वर्धा येथील गोदामात दारूच्या बाटल्या सापडल्या. वर्धा हा दारुबंदीचा जिल्हा आहे. दारू व पैसा वाटून हे लोक मतदान मागण्यासाठी नोट जिहाद करत आहेत का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. भाजप घटनात्मक व्यवस्थेला मानत नाही. काँग्रेस नेहमीच असा आरोप करते. कुणी कुणाला मतदान करावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण त्याला हे लोक व्होट जिहाद म्हणतात. याला ब्राह्मण जिहाद म्हणता येईल का? महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने भाजपला मतदान देण्याचा निर्णय घेतला. याला ब्राह्मण जिहाद म्हणता येईल का? काय सुरू आहे महाराष्ट्रात? मतदान हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. त्या अधिकाराचे हनन करता येणार नाही. भाजप आज पैसा व दारू वाटून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. हा नोट जिहाद आहे की दारू जिहाद आहे? असे नाना पटोले म्हणाले. पत्रकारांनी यावेळी नाना पटोले यांना महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार का? असा थेट प्रश्न केला असता त्यांनी सकारात्मक प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रात निश्चितपणे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल. राज्यात आमचेच सरकार येईल, असे ते म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी झालेल्या मतदानात सरासरी 65 टक्के मतदान झाले. आता शनिवारी मतमोजणी होणार असून, त्यानंतर राज्यात कुणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. हे ही वाचा... गुवाहाटी पार्ट -2 करण्याची गरज नाही:पण आम्हाला भारतभ्रमण करण्याची हौस, दुसरा प्रदेश पाहू, संजय शिरसाट यांचे विधान छत्रपती संभाजीनगर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे. तसेच आपल्याला गुवाहाटी पार्ट -2 करण्याची गरज नसल्याचेही ठणकावून सांगितले आहे. आम्हाला गुवाहाटी पार्ट 2 करण्याची गरज नाही. आम्ही एखादा दुसरा प्रदेश पाहू. त्याची चिंता कुणीही करू नये, असे ते म्हणालेत. शिरसाट यांनी यावेळी संजय राऊत यांचा महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा दावाही फेटाळला. वाचा सविस्तर
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)