लगीनघाई, शेवगावात वाहतूक कोंडी, नवरदेवही अडकले वाहनांच्या गर्दीत:आठवडे बाजारामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प, नागरिकांचे झाले मोठे हाल
4 hours ago
1
रविवारी लग्नाचा मुहूर्त.. त्यात शेवगावाचा आठवडे बाजार.. शहरात ठिकठिकाणी विवाह सोहळे असल्याने अक्षता टाकण्यासाठी प्रत्येकालाच लगीनघाई झालेली.. त्यात रस्त्यावर लावलेली वाहने, डिजेचा दणदणाट अन् त्यावर बेधुंद होऊन रस्त्यावरच नाचणारी तरुणाई.. यामुळे शेवगाव शहरातील वाहतुकीचे रविवारी (१९ जानेवारी) तीन तेरा वाजले.. शहरातील गाडगेबाबा चौक, क्रांती चौक, नित्यसेवा हॉस्पिटल रोड, नेवासा रोड आणि मुख्य बाजारपेठेत वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतूक तब्बल दोन तास अक्षरक्ष: ठप्प झाली होती. शेवगावचा आठवडे बाजार दर रविवारी भरतो.. बहुतांश विक्रेते हे रस्त्याच्या बाजूलाच बसतात. त्यामुळे विक्रेते अन् बाजारकरूंचा रस्त्यावरच ‘बाजार’ भरलेला असतो. त्यात रविवारी लग्नाचा मुहूर्त असल्याने शहर परिसरात अनेक ठिकाणी लग्न सोहळे सुरू होते. आठवडे बाजार अन् एकाच वेळी विवाह सोहळ्याची गर्दी झाल्याने अवघे शेवगाव शहर ‘जॅम’ झाले होते. काही नवरदेवांच्या गाड्याही या कोंडीत अडकून पडल्या. त्यामुळे साहजिकच त्यांचा विवाह मुहूर्त टळला.. शहरातील काही भागात वाहतूक कोंडी इतकी होती की, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किमान दोन तास लागत होते. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. लग्न समारंभांना उशीर होत असल्याने अनेकांचे कार्यक्रम हुकले. शेजारील तालुक्याचे लोकप्रतिनिधींना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. आठवडे बाजारासाठी पर्यायी जागा शोधणे, नेवासे रोडवर वाहतूक व्यवस्था सुधारणे आणि शहरातील अतिक्रमणे हटवणे. वाहने रस्त्यावर उभी न करता वाहनतळाची व्यवस्था करावी, असा सूर नागरिकांमधून उमटत होता. शहरातील प्रश्नावर स्थानिक प्रशासन अद्याप मौन बाळगून आहे. शहराच्या तिन्ही बाजूस साखर कारखाने असल्याने ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरला असलेल्या डबल ट्रेलर, तसेच मालवाहतूक गाड्या, मोटारसायकलीमुळे वाहतूक कोंडी होते. अनेक अपघातही झाले आहेत. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरचालक वाहनाचा कर्णकर्कश आवाज करून वाहने चालवतात. शेवगावला वाहतूक कोंडीचे कारण लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन हा प्रश्न कायमचा कसा मार्गी लागेल, याकडे लक्ष द्यावे. माजी खासदार सुजय विखे यांनी बाह्यवळण रस्त्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, त्यांना लोकसभा निवडणुकीत अपयश आले. आता या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. खंडोबा मैदानात बाजार भरवावा प्रत्येक रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी शेवगाव शहरात मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यामुळे हा आठवडे बाजार हा रस्त्यावर न भरवता खंडोबा मैदानात भरवावा, अशी नागरिकांची मागणी आहे. त्याकडे नगरपरिषदेने लक्ष घालून बाजार रस्त्यावर भरवण्यापेक्षा मोठी जागा असेल, त्या ठिकाणी भरवण्याची गरज आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)