Published on
:
24 Nov 2024, 12:27 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:27 am
सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रत्येक टप्प्यावर लक्षवेधी ठरली. भाजपचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांची ‘गुगली’ ते ‘हॅट्ट्रिक’ भल्याभल्यांना चकित करून गेली. लाडकी बहीण, विकास कामे, शांत व संयमी प्रचार आणि प्रचाराच्या सूक्ष्म नियोजनाने गाडगीळ यांचा विजय सुकर झाला. मुस्लिम मते एकगठ्ठा होत असल्याची चर्चा जोरात झाल्याने ‘हिंदुत्व’ ही गाडगीळ यांच्या मदतीला धावून आले. बंडखोरी रोखण्यात आलेले अपयश काँग्रेसला नडले आहे. तरीही आमदार गाडगीळ यांना मिळालेले मताधिक्य निर्णायकी वर्चस्व सिद्ध करणारे ठरले आहे.
दहा वर्षांत सांगली शहर व परिसरात भाजपची चांगलीच हवा झाली होती. सर्वत्र भाजपचाच गाजावाजा सुरू होता. दिल्लीत आणि गल्लीत भाजपच सत्तेत असल्याने ताकद वाढत होती. काँग्रेस, राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली. विधानसभेच्या 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. सांगली महानगरपालिकेतही एकहाती सत्ता आली. मात्र पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. सांगली विधानसभा क्षेत्रात भाजपला तब्बल 19 हजार 192 मते कमी मिळाली. त्याने जणू भाजपच्या शिडातील हवाच निघून गेल्यासारखी स्थिती झाली. ‘कार्यसम्राट’ आमदार अशी ओळख असलेल्या सुधीर गाडगीळ यांच्यासाठीही ही निवडणूक जणू अग्निपरीक्षाच ठरणार, असे चित्र दिसत होते. अशातच पक्षात विधानसभेसाठी इच्छुकांची संख्याही वाढली होती.
या सर्व पार्श्वभूमीवर आमदार गाडगीळ यांनी निवडणुकीच्या राजकारणाचा संन्यास घेत असल्याचे अचानकपणे जाहीर केले आणि खळबळ उडवून दिली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्यासह डझनभर इच्छुक उमेदवारी मिळवण्यासाठी मैदानात उतरले. पण गाडगीळ यांनीही विकास कामांची उद्घाटने, लाडक्या बहिणींचे मेळावे घेण्याचा धडका लावला होता. अखेर आमदार गाडगीळ यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली. गाडगीळ यांची ‘गुगली’ अनेकांना चकवून गेली. काही इच्छुकांची नाराजी लवकर दूर झाली नाही. तरीही आमदार गाडगीळ यांनी शांत, संयमी भूमिका घेत प्रचार सुरू ठेवला.
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसमध्ये प्रचंड आत्मविश्वास आला होता. सांगली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय पक्का मानला जात होता. त्यामुळे उमेदवारीसाठी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील हे इरेला पेटले होते. पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळताच जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी कायम राहिली. काँग्रेसमधीलच दोन गट आमने-सामने आल्याने भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. स्वच्छ प्रतिमा आणि दहा वर्षांतील विकास कामे हे गाडगीळ यांची प्रमुख जमेची बाजू. पण त्याचबरोबर ‘लाडकी बहीण’ योजनाही त्यांच्या मदतीला धावून आली. आमदार गाडगीळ यांचा प्रचार शांत व संयमीपणे सुरू होता. ‘मौनी आमदार’ या टीकेवर त्यांनी दहा वर्षांतील 4 हजार कोटींची कामे पुढे करत उत्तर दिले. विरोधकांवर आरोप, टीका न करता समाजातील प्रत्येक घटकांच्या गाठीभेट घेत संवाद साधण्यावर भर दिला. पहाटेपाहसून रात्री उशिरापर्यंत त्यांचा प्रचार सुरू असे. अतिशय सूक्ष्मपणे केलेल्या नियोजनानुसार गाडगीळ यांचा प्रचार सुरू होता.
बूथ प्रमुख, शक्तिप्रमुख, पन्ना प्रमुख यांच्या कामाचे सूक्ष्म नियोजन केले होते. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. भाजपचे पक्ष निरीक्षक तसेच वेगवेगळ्या स्वतंत्र जबाबदार्या घेऊन पक्षाचे नेते सांगलीत येत होते आणि प्रचार व नियोजनाची जबाबदारी सांभाळत होते. कोणताही गाजावाजा न करता हे काम सुरू होते. आमदार गाडगीळ यांना भाजपचे सर्व नेते, कार्यकर्त्यांची साथ मिळाली. त्यातून त्यांनी सांगलीत लक्षवेधी विजय मिळवला. सांगलीतून यापूर्वी संभाजी पवार यांनी सलग तीन निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यांनी 1986 ची पोटनिवडणूक आणि 1990 व 1995 ची सार्वत्रिक निवडणूक जिंकली होती. त्यानंतर आता आमदार सुधीर गाडगीळ हे विजयाची हॅट्ट्रिक करण्यात यशस्वी झाले आहेत.