पिंपरी : शहरातील नागरिकांच्या तक्रारी, समस्या व अडचणी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे महिन्याच्या पहिल्या सोमवारी थाटामाटात लोकशाही दिन उपक्रम राबविण्यात सुरुवात केली आहे. सोमावारी (दि.6) झालेल्या पहिल्याच लोकशाही दिनास 30 लाख लोकसंख्या असलेल्या शहरातून केवळ दोनच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
या वेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उपायुक्त तथा समन्वय अधिकारी राजेश आगळे, कार्यकारी अभियंता एस. एन. नरोटे, प्रभारी कार्यकारी अभियंता सूर्यकांत मोहिते, प्रशासन अधिकारी अधिकारी श्रद्धा बोर्डे, उपअभियंता विकास घारे, नरेश जाधव, कनिष्ट अभियंता संतोष जगदाळे, ए. एम. वाकोडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
महापालिका बरखास्त होऊन प्रशासकीय राजवट सुरू आहे. नगरसेवक नसल्याने नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयात दर सोमवारी जनसंवाद सभा सुरू केली. नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असल्याने या सभा महिन्यांत दोनच सोमवारी घेण्यात येत आहे. सभेत केलेल्या तक्रारींवर गांभीर्याने पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे या सभांतून नागरिकांच्या अपेक्षाभंग झाल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून आता महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा करण्याचा नवीन उपक्रम महापालिकेने हाती घेतला आहे. पहिल्या सभेत केवळ दोनच तक्रारी प्राप्त झाल्याने या उपक्रमाचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट होत आहे.