लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही तुतारीला बसला ट्रम्पेटचा फटका; 9 मतदारसंघांत राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत

2 hours ago 1

लोकसभा निवडणुकीत सर्वात चांगला स्ट्राईक रेट असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (शरदचंद्र पवार) तुतारी चिन्हाला मोठा फटका बसला होता. लोकसभा निवडणुकीत मतदारांमध्ये तुतारी चिन्हावरून घोळ झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती तुतारी आणि ट्रम्पेट चिन्हाच्या संभ्रमामुळे विधानसभा निवडणुकीत झाली त्याचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किमान नऊ विधानसभा मतदारसंघांत ट्रम्पेटचा मोठा फटका बसल्याचे पुढे आले आहे.

लोकसभा निवडणुकीत नऊ मतदारसंघांत तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी अशी दोन चिन्हे होती. त्यामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला परिणामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खुद्द बारामती तसेच माढा, सातारा, बीड, रावेर, शिरुर, भिवंडी, दिंडोरी, नगर लोकसभा मतदारसंघात फटका बसला होता. आता विधानसभेत आठ ते नऊ  मतदारसंघांत ट्रम्पेट या चिन्हाचा राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाला फटका बसला आहे.

शहापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) पांडुरंग बरोरा निवडणूक रिंगणात होते. त्यांच्या समोर ट्रम्पेट चिन्हावर अपक्ष उमेदवार रिंगणात होता. अपक्ष उमेदवाराला ट्रम्पेट चिन्हामुळे 3,892 मते मिळाली. त्यामुळे पांडुरंग बरोरा यांचा 1,672 मतांनी पराभव झाला.

वळसे-पाटलांना ट्रम्पेटचा फायदा

आंबेगावमध्ये अजित पवार गटाचे दिलीप वळसे-पाटील यांनी राष्ट्रवादीचे देवदत्त निकम 1,523 मतांनी  यांचा पराभव केला. या मतदारसंघात ट्रम्पेट चिन्ह घेऊन निवडणूक लढवत असलेल्या देवदत्त शिवाजी निकम यांनी 2,965 मते घेतली. त्याचा फटका राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांना बसला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना वळसे-पाटील यांनी ट्रम्पेट चिन्हाने घेतलेल्या मतांचा आपल्याला फायदा झाल्याची कबुली दिली.

बेलापूर मतदारसंघातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप नाईक यांचा फक्त 377 मतांनी पराभव झाला. ट्रम्पेट निशाणी असलेल्या अपक्ष उमेदवाराला तब्बल 2 हजार 860 मते मिळाली.

केज मतदारसंघात पृथ्वीराज साठे तुतारी चिन्हावर होते. त्यांचा 2 हजार  687 मतांनी पराभव झाला. या मतदारसंघात ट्रम्पेट निशाणीला 3 हजार 558 मते मिळाली.

परांडा मतदारसंघात राहुल मोटे यांचा 1 हजार 509 मतांनी पराभव झाला. कारण ट्रम्पेट निशाणीमुळे अपक्ष उमेदवाराला 4 हजार 446 मते मिळाली.

अणुशक्तीनगर मतदारसंघातून अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद  हे तुतारी चिन्हावर निवडणूक रिंगणात होते. ट्रम्पेट चिन्हामुळे त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार फहाद अहमद यांना 3, 378मतांनी पराभव झाला. ट्रम्पेट चिन्हाला 4 हजारांहून अधिक मते मिळाली.

घनसावंगीत ट्रम्पेट निशाणीवर लढणाऱया अपक्ष उमेदवाराला 4,830 मते मिळाली. यामुळे राजेश टोपे यांचा 2,309 मतांनी पराभव झाला.

पारनेरमध्ये राष्ट्रवादीच्या राणी लंके यांचा 1,526 मतांनी पराभव झाला कारण या मतदारसंघात ट्रम्पेटला 3,582 मते मिळाली.

जिंतूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबरे यांचा 4,516 मतांनी पराभव झाला. कारण ट्रम्पेट निशाणीचे बटण 7,430 मतदारांनी दाबले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article