Published on
:
26 Nov 2024, 1:25 am
रत्नागिरी : राज्यासह रत्नागिरीच्या मतदारसंघातही वातावरण विरोधात आहे, अशी परिस्थिती दर्शवली जात असतानाच मतदारसंघात अत्यंत ‘सूक्ष्म’ नियोजन करताना, काही ठराविक शिलेदारांवर जबाबदारी फिक्स करीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना चारीमुंड्या चित केले. उबाठात असणारी बाळ मानेंविरोधातील नाराजी हेरुन, उबाठाचे मतदारसंघात पानिपत केले.
विधानसभेच्या आधीच पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदार संघात उबाठाचे उमेदवार विनायक राऊत यांना तब्बल 10 हजारांचे मताधिक्क्य मिळाले होते. त्यानंतर संपूर्ण मतदारसंघात वातावरण ‘मविआ’च्या बाजूने गेले होते. मुस्लिम समाजही ‘मविआ’सोबत ठाम राहिल्याचे चित्र होते. ही निवडणूक महायुतीसाठी जड जाणार असेच राज्यासह रत्नागिरीतही वातावरण निर्मिती झाली होती. याच दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सत्ताधार्यांनी राबवली आणि बदललेल्या वातावरणाचा नूर पालटू लागला.
रत्नागिरी मतदारसंघात पालकमंत्री उदय सामंत यांना घेरण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. हिंदू विरोधी वातावरण निर्माण करण्यात विरोधकांना यश मिळत असल्याचे दिसत होते. त्यात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होऊ नये यासाठीही विरोधक सातत्याने प्रयत्न करीत होते. सामंतांविरोधात भाजपामध्येही वातावरण विरोधात जाईल, अशा चाली रचल्या गेल्या. परंतु विरोधकांना सामंत यांनी आपल्या ‘सूक्ष्म’ नियोजनाने पूर्ण जेरीस आणले
यापूर्वीच्या चारही निवडणुकीत पूर्ण यंत्रणा हाताळणारे किरण सामंत यावेळी स्वत:च राजापूरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात असल्याने, उदय सामंत यांनी संपूर्ण प्रचाराची यंत्रणाच आपल्या ताब्यात घेतली. कार्यकर्त्यांना योग्य दिशा दिला. तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, युवासेनेचे तुषार साळवी, अभि दुड्ये, महिला आघाडीच्या शिल्पा सुर्वे, स्मितल पावसकर यांच्यावर टाकण्यात आलेल्या जबाबदार्या त्यांनी यथोचित पार पाडल्या. वाटद जि.प. गटात बाबू पाटील, बाबय कल्याणकर, अजिम चिकटे यांनी केलेल्या कामाने पहिल्या केंद्रापासूनच मताधिक्क्य मिळाले. शिरगाव जि.प. गटात भय्या शिंदे यांना उपतालुकाप्रमुखपदी बढती दिल्यानंतर टाकण्यात आलेली जबाबदारी त्यांनी उत्तम पार पाडत या गटात मताधिक्क्य मिळवून दिले.
भाजपमध्ये असलेला असंतोष त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निवळवण्यात यश मिळवले. यात अनिकेत पटवर्धन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे उबाठाच्या बाळ यांच्याकडे सरकरणारी मते मोठ्याप्रमाणात महायुतीकडे थांबवण्यात त्यांना यश आले. भाजपाने हातातहात घालू काम केल्याने मोठे मताधिक्क्य मिळाले. प्रचारातील सूक्ष्म नियोजन व स्वत: ताब्यात ठेवलेली प्रचार यंत्रणा यामुळे बाळ माने यांना उदय सामंत यांनी अंतर्गत बदलेल्या वार्याचा सुगावाही लागू दिला नाही. आपलाच विजय होणार, असे मानणार्या बाळ मानेंना त्यामुळे चौथ्यांदा चारीमुंड्याचित करण्यात उदय सामंत यांना यश मिळाले.
उबाठाकडून उदय बने यांच्याऐवजी बाळ माने यांना उमेदवारी दिल्यामुळे आधीच विभागप्रमुख व पदाधिकारी नाराज झाले होते. त्यातच निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उबाठाच्या पदाधिकार्यांना त्यांनी शिवसेनेत घेत, छोट्या छोट्या मतांची बेगमी केली. उबाठाच्या बालेकिल्ल्यात किल्लेदारांनाच फोडल्यामुळे शेवटच्या टप्प्यात उबाठाला मोठा धोबीपछाड दिला. लोकसभेला मुस्लिम समाज शंभर टक्के मविआसोबत होता. परंतु यावेळी तीस टक्के समाजाची मते वळवण्यात सामंताना यश आले.