वाडिया पार्कचे भव्य स्टेडियम करण्यासाठी आर्थिक मदत देणार: अजित पवारPudhari
Published on
:
03 Feb 2025, 3:04 am
Updated on
:
03 Feb 2025, 3:04 am
नगर: अहिल्यानगर येथील एवढी मोठी बक्षीसे असलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा मला कुठे बघायला मिळालेली नाही असे गौरवोदगार काढीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांचे कौतूक केले.
राज्यातील क्रीडा विकासाला चालना देतांना प्रत्येक खेळासाठी आवश्यक आर्थिक सहकार्य करण्यास शासन मागे हटणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. अहिल्यानगर येथील वाडिया पार्क येथे भव्य स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
अहिल्यानगर येथील वाडिया पार्कमध्ये रविवारी कै.बलभिम अण्णा जगताप क्रीडानगरीत झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माऊली खटके, काशिनाथ दाते, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै.रामदास तडस, माजी आमदार अरुणकाका जगताप,माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आदी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक ओला, मनपा आयुक्त डांगे यांच्यासह स्पर्धेचे आयोजक व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या स्पर्धेचा कार्यक्रम आमदार जगताप आणि त्यांच्या सहकारी आणि कुस्ती परिषदेच्या आयोजकांच्या मदतीमुळे दिमाखदार झाला आहे. ही स्पर्धा राज्यभरातील सर्वाच्या लक्षात राहिल असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला.
राज्यातील विविध खेळ आणि विविध स्पर्धांसाठी शासनाच्या वतीने जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्यासह आम्ही आर्थिक मदत कमी पडू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. पालकमंत्री विखे पाटील यांनी वाडिया पार्क येथे भव्य स्टेडियम उभारणीसाठी 50 कोटी निधींची मागणी केली. या मागणीची पूर्तता करण्यास देखील मागे राहाणार नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, महाराष्ट्र ही कुस्तीची पंढरी आहे. या राज्याने मारुती माने, काका पवार, आंदळकर असे अनेक मल्ल देशाला दिले आहेत. मामासाहेब मोहोळ यांनी 67 वर्षांपूर्वी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा सुरु केली आहे. महाराष्ट्र केसरी पदक विजेत्या खेळाडूपैकी अनेक जण राज्य शासनाच्या अधिकारीपदावर विराजमान झाले आहेत.
येत्या काळातही कुस्तीला राजाश्रय मिळेल असा विश्वास व्यक्त करून राज्याची ही परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील, अशी अपेक्षा केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांनी व्यक्त केली. देशात आणि राज्यातील अनेकांनी कुस्ती खेळाला नावलौकिक मिळवून दिला आहे. त्यामुळे कुस्ती खेळाला बदनाम करु नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.
प्रा. राम शिंदे म्हणाले, कुस्ती स्पर्धेतील धोबीपछाड, अस्मान दाखविणे आदी विविध डाव आता राजकीय आखाड्यात आतून बाहेरुन सुरु आहे. राजकीय क्षेत्रात नुरा कुस्ती खेळली जाते. आगामी निवडणुकीत त्यावर लक्ष ठेवले जाते. परंतु कुस्ती खेळात नुरा कुस्ती खेळली जात नाही. या स्पर्धेत होणार नसल्याचा विश्वास विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केला. राज्य शासन आणि राज्य कुस्ती संघाने अहिल्यानगर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची संधी उपलब्ध करुन दिली. ही स्पर्धेचे उत्तम पध्दतीने आयोजन आणि नियोजन आमदार संग्राम जगताप यांनी केले. याबदृल ते अभिनंदनास पात्र आहेत. असे गौरवोदगार सभापती शिंदे यांनी काढले.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगर वासियांसाठी मोठी पर्वणी आहे. वाडिया पार्क येथे आगामी वर्षात रणजी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा विचार आहे. वाडिया पार्कचे मोठ्या स्टेडिअममध्ये रुपांतर करायचे आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी 50 कोटींचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी पालकमंत्री विखे पाटील यांनी केली. या स्पर्धेच्या आयोजनाचे सर्व श्रेय आमदार संग्राम जगताप यांना दिले पाहिजे, असे म्हणत त्यांनी त्यांचे कौतूक केले.
क्रीडामंत्री भरणे म्हणाले, क्रीडा मंत्री या नात्याने राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक ती मदत आणि सहकार्य करण्याचा प्रयत्न भविष्यात केला जाईल, असे आश्वासन क्रीडा व युवा कल्याण मंत्री दत्ता भरणे यांनी यावेळी दिले.
राज्याला कुस्तीची गौरवशाली परंपरा आहे. आमदार संग्राम जगताप यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे नियोजन चांगले केले. याबद्दल ते कौतुकास पात्र असल्याचे ते म्हणाले. या स्पर्धेत नामवंत मल्लांनी भाग घेतला. त्याचे देखील अभिनंदन करत आहे. 2005 मध्ये माजी आमदार अरुणकाका जगताप यांनी नगर येथेच हिंद केसरी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील विजेता योगेश दोडके च आज या स्पर्धेत आयोजकाची भूमिका पार पाडत आहे तेच या स्पर्धेचे वैशिष्ठ असल्याचे मंत्री भरणे म्हणाले.
प्रास्ताविकात आमदार संग्राम जगताप यांनी प्रास्ताविकात कुस्ती स्पर्धेविषयी माहिती दिली. लाल मातीच्या खेळातून संस्कार होत असल्याने राज्यभरात या खेळाचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कुस्ती स्पर्धेमुळे अहिल्यानगरचे नाव राज्यभरात प्राधान्याने घेतले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या स्पर्धेसाठी कुस्तीगीर संघटना तसेच राजकीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिक परिश्रम घेतले. त्यांचे देखील त्यांनी आभार मानले.
आमदार जगतापांवर कौतुकांचा वर्षाव
गेल्या पाच दिवसांपासून अहिल्यानगरात कुस्ती स्पर्धा झाली. भव्य दिव्य झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील नामवंत मल्लांनी हजेरी लावली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात बक्षीसांची रेलचेल होती. उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन केल्याबदृल आमदार संग्राम जगताप यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ, सभापती राम शिंदे पालकमंत्री विखे पाटील, क्रीडामंत्री दत्ता भरणे आदींसह कुस्ती परिषदेचे पदाधिकारी आणि नागरिकांनी कौतूक केले.