विदर्भात महायुतीला 30-35, मविआला 22-25 जागांवर यश शक्य:62 जागांवर नेमकी हवा कुणाची?
1 hour ago
1
साेयाबीन व कापसाला उत्पादन खर्चाइतकाही भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहे. त्याचा फटका महायुतीला बसून महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता आहे. जात-धर्मावरच प्रचाराचा जोर आहे. विकासाचे मुद्दे मात्र हरवले आहेत.
वेळ सकाळी ९.३० वाजेची. स्थळ : अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती. सोयाबीनची पोती आवारात उपसली जाताहेत. पाय ठेवायलाही जागा नाही. वायगावचे शेतकरी राजाभाऊंनीही सोयाबीन विक्रीसाठी आणलेय. “शासनाचा हमीभाव प्रतिक्विंटल ४८९२ रुपये. मात्र हातात क्विंटलला ३४०० रुपये भाव मिळाला. एकरी खर्च १०,००० रुपये आला. आता पोरीचे लग्न तसेच वर्षभर गुजारा कसा करायचा, तुम्हीच सांगा?’ असा प्रश्न राजाभाऊ हे सोयाबीनची विक्री केल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता मला विचारतात. विदर्भात साधारणत: १७ लाख हेक्टरवर सोयाबीन तर १८ लाख हेक्टवर कपाशीचा पेरा आहे. दोन्ही पिकांना उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड नाराज आहे. त्याचा फटका सत्ताधारी महायुतीला बसण्याची शक्यता आहे. सर्वाधिक झळ पश्चिम विदर्भात बसेल. कारण सोयाबीनचा पेरा याच भागात सर्वाधिक आहे. महायुतीला साधारणत: ३० ते ३५ तर महाआघाडीला २२ ते २५ जागा मिळण्याची शक्यता आहे. अपक्षांना २ ते ४ जागा मिळतील असा अंदाज आहे. राजकीय सभांमुळे विदर्भ तापला आहे. बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ हैं, त्यांना संविधान बदलायचे आहे, लाडकी बहीण, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप असे सत्ताधारी अन् विरोधकांचे प्रचाराचे मुद्दे आहेत. मात्र सोयाबीन, कापसाला रास्त भाव, रोजगार, शेतीला मुबलक पाणी, संपूर्ण विदर्भाचा सर्वांगीण विकास हे मुद्दे हरवले आहेत. यापूर्वीही सत्ताधारी व विरोधकांनी सोयाबीन व कापसाला चांगला भाव देऊ, अशी आश्वासने दिली होती. आता पुन्हा आश्वासने दिली जात आहेत.
विधानसभेच्या ६२ जागांवर राजकारण्यांचा डोळा आहे, त्यापैकी जास्तीत जास्त जागा आपल्याला कशा मिळतील यासाठी राजकारण्यांचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. कारण सत्तेचा मार्ग याच विदर्भातून जाणार आहे, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. लोकसभेच्या १० जागांपैकी फक्त २ जागा भाजपला मिळाल्या. हे नुकसान आता विधानसभेला होऊ नये म्हणून भाजपने ताकद पणास लावली आहे. बहुसंख्य जागी प्रस्थापितांनाच संधी दिली आहे. कार्यकर्ते सतरंज्याच उचलताहेत. नागपूर झकास झाले आहे. मेट्रोने प्रवास सुकर झाला. येथे हाताला काम मिळतेय, पोट भरतेय. मात्र गाव भकास आहे. रोजगार मिळत नसल्याने गाव सोडून नागपुरात यावे लागलेय, अशी खंत महाल परिसरात रेडिमेड कपडे विक्री करणारा वाशिमचा नंदू व्यक्त करत होता. ‘लाडकी बहीण’चे १५०० मिळताहेत, मात्र महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. कुणीही येवो, सर्व एकाच माळेचे मणी...असे नागपुरातील दीक्षाभूमीला वंदन करण्यासाठी आलेल्या बुलडाण्याच्या मीराबाई सांगत होत्या.
पूर्व विदर्भात काट्याची लढत पूर्व विदर्भात ३२ तर पश्चिम विदर्भात ३० अशा एकूण ६२ जागा आहेत. त्यापैकी एकट्या नागपुरात १२ जागा आहेत. पूर्व विदर्भात रामटेक, सावनेर, मध्य नागपूर, पश्चिम नागपूर, चंद्रपूर, आर्वी, वर्धा येथे काट्याची लढत आहे. पश्चिम विदर्भातही काही जागांवर चुरस आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)