विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातून 268 बसची मागणी:सिंदखेडराजा व मेहकर आगारातून 43 बस लागणार
6 days ago
2
बुलडाणा जिल्हयातील सातही मतदान केंद्रावर मतदानाचे साहित्य, ईव्हीएम मशिन व त्या केंद्रावरील कर्मचाऱ्यांना पोहोचवण्यासाठी व मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना परत आणण्यासाठी २६८ बसची मागणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभाग नियंत्रकाकडे केली आहे. मात्र एवढ्या बस दिल्यानंतर महामंडळाकडे बसेसच शिल्लक न राहिल्यास प्रवासी वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. अशावेळी अवैध प्रवासी वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघात येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. मतदान केंद्रावर कर्मचारी व साहित्य पोहोचवण्यासाठी १९ नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या दिवशी २० नोव्हेंबर रोजी या बस लागणार आहेत. प्रशासनाकडून मतदानाची तयारी अंतिम टप्यात आली असून मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना मतदानाबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर कर्मचाऱ्याच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व परत आणण्यासोबतच इव्हीएम मशीन व इतर साहित्य ने-आण करण्यासाठी संबंधित मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने बस व्यवस्था करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या बस बरोबरच गरज पडल्यास स्कूल बसची व्यवस्था सुध्दा करण्यात आली आहे. ज्या गावात बस किंवा स्कूल बस जात नाही, अशा गावातील मतदान केंद्रावर शासकीय वाहनातून कर्मचारी व ईव्हीएम मशीन पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या बसच्या माध्यमातून सुरक्षितपणे कर्मचाऱ्यांना व मतदानासाठी लागणारी ईव्हीएम मशीन सुरक्षितपणे मतदान केंद्रावर पोहोचून व परत येण्यासाठी मदत होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या कर्मचाऱ्यांसोबत पोलिस कर्मचारी सुध्दा राहणार आहेत. विधानसभा मतदारसंघ निहाय बसची संख्या मलकापूर ३०, बुलडाणा ४२, चिखली ३९, सिंदखेडराजा ४३, मेहकर ४३, खामगाव ३१, जळगाव जामोद ४० अशा एकूण २६८ बस लागणार आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)