Published on
:
21 Nov 2024, 1:25 am
Updated on
:
21 Nov 2024, 1:25 am
कराड : भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटण्यासाठी आल्याचा आरोप फेटाळला आहे. मात्र त्यानंतरही विरोधी पक्षांकडून आरोप केले जात आहेत. त्यामुळेच त्यांच्या माध्यमातून महायुतीला बदनाम करण्याचे षडयंत्र आखले असल्याची शंका आम्हाला असल्याचे सांगत पोलीस चौकशीतून सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, महायुतीचे उमेदवार मंत्री शंभूराज देसाई यांनी मरळी येथे कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत मातोश्री विजयादेवी देसाई, पत्नी स्मितादेवी देसाई, बंधू रविराज देसाई, मंत्री शंभूराज देसाई यांचे चिंरजीव देसाई कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई उपस्थित होते.
मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री देसाई म्हणाले, पाटण विधानसभा मतदारसंघात मतदारांकडून महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. असाच प्रतिसाद संपूर्ण राज्यात महायुतीला मिळत असून महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. त्यामुळेच शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात महायुतीला 170 हून अधिक जागा मिळतील असा विश्वास ना. शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारी भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांच्यावर केवळ पैसे वाटप करण्याचा आरोप आहे. या आरोपात तथ्य आहे अथवा नाही याबाबत पोलीस चौकशी सुरू आहे. विनोद तावडे यांनीही याबाबतचे आरोप स्पष्टपणे नाकारले आहेत, असे सांगत पोलिसांचा अहवाल आल्यानंतर सत्य समोर येईल. मात्र विनोद तावडे यांच्यावर केवळ आरोप झाल्याकडे लक्ष वेधत या माध्यमातून महायुतीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याची शंका आहे. बदनामीचे षडयंत्र आखले असल्याबाबतही पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी ना. शंभूराज देसाई यांनी केली आहे. पाटण मतदार संघात मतदारांनी महायुतीला चांगली साथ दिल्याचे दिसत आहे. मतदारांनी उत्स्फूर्त मतदान केले आहे. मला यशाची खात्री आहे.