Published on
:
03 Feb 2025, 12:34 am
Updated on
:
03 Feb 2025, 12:34 am
कराड : केवळ राजकारणासाठी विरोधकांना सह्याद्रि कारखाना हवा आहे. पैशाच्या जोरावर यशवंत विचार ते विकत घ्यायला निघाले असले तरी स्वाभिमान पैशाने विकत घेता येत नाही, असा टोला लगावत विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, अशी इशारा सह्याद्रि कारखान्याचे चेअरमन, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
कराड येथे सह्याद्रि कारखाना सभासदांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुभाष डुबल, महादेव पवार, शहाजी डुबल, संभाजी सुर्वे, शंकरराव चांदे, राजेंद्र यादव, अॅड. मानसिंगराव पाटील, हणमंतराव पवार यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब पाटील म्हणाले, सह्याद्रि कधीही ऊस दरात मागे राहिलेला नाही. आजपर्यंत राज्यात सर्वाधिक दर दोन वेळा सह्याद्रिने दिला होता. त्यावेळी मानसिक त्रासही झाला. परंतु दरात अग्रेसर राहण्याची परंपरा कारखान्याने कायम ठेवली आहे. आज सहकारी कारखान्यांसमोर खासगी कारखान्यांचे संकट आहे. त्यामुळे सहकारी कारखान्यांना चांगले काम करावे लागेल. सहकारी कारखाने कमी झाले, तर खासगी कारखानेवाले एकत्र येऊन ऊस दर फिरवू शकतात. त्यामुळे सहकारी साखर कारखाने टिकण्यासाठी सभासदांचे योगदान महत्त्वाचे आहे.
कारखान्याबाबत विरोधक फेक नेरेटिव्ह पसरवत असून त्यावर सभासदांनी विश्वास ठेवू नये. गेल्या मंगळवारी कारखान्याचे ऊस वजन काटे अचानक तपासण्यात आले. त्यात काहीही फरक नव्हता. तरीही त्याचा अपप्रचार खासगी कारखानावाले करत आहेत. दुर्दैवाने काही लोक या अपप्रचाराला बळी पडत आहेत. मात्र कोणत्या प्रवृत्तींच्या मागे जात आहोत याचा विचार केला पाहिजे. कारखान्याच्या विस्तारवाढीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विस्तारवाढ झाल्यानंतर ऊस विलंबाचा प्रश्न राहणार नाही. कारखान्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभासदांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यात कोणतेही राजकारण नाही. कारखान्याला ऊस घालेल त्याला सभासदत्व देण्याची स्वर्गीय पी. डी. पाटील यांनी घालून दिलेली परंपरा यापुढेही कायम ठेवण्यात येईल.
माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी सभासदांनी विघ्नसंतोषी लोकांना थारा देऊ नये. अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले. मानसिंगराव पाटील, हणमंतराव पवार, अधिकराव पवार, राजेंद्र यादव, दिलीप घोडके, डॉ. अशोक गुजर यांची भाषणे झाली. अॅड. सतीश पिसाळ यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र माने यांनी आभार मानले.