वृद्ध कलावंतांचे प्रस्ताव तातडीने निकाली काढावे:जिल्हाधिकाऱ्यांना साकडे, मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन

3 hours ago 1
गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेकडो वृद्ध कलावंतांचे प्रलंबित असलेले मानधन प्रस्ताव आचार-संहिता लागण्यापूर्वी जुन्या निकषानुसार निकाली काढावे, यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना साकडे घालण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निवड समितीच अस्तित्वात नव्हती. परंतु पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने निवड समिती गठित झाली असून सदर समितीची त्वरेने बैठक घ्यावी, अशी या कलावंतांची मागणी आहे. यासाठी स्थानिक कलारसिक संस्थेतर्फे जिल्ह्यातील दूरदर्शन व आकाशवाणी लोक-कलावंत प्रमोद पोकळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांची अलिकडेच भेट घेण्यात आली. यावेळी कलारसिक संस्थेचे अध्यक्ष भोलेश्वर मुदगल, योगीराज राघोर्ते, निरंजन प्रघणे, ज्ञानेश्वर आंबटकर, दादाराव उघडे, अनिल गवारे, दिपक कोष्टी, नंदकिशोर पाटील व प्रकाश वानखडे हेदेखील उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात सकारात्मकता दर्शविली असून निवड समितीला योग्य ते निर्देश दिले जातील, याबाबत आश्वस्त केले आहे. कला, संगीत व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देऊन, लोककला आणि सांस्कृतिक परंपरांची जोपासना करणाऱ्या कलावंतांना थकत्या काळात आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागतो. कधी-कधी त्यांची उपासमारही होते. परंतु असे होऊ नये म्हणून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सन्मानाने जगता यावे, यासाठी शासनाकडून कलावंतांना मानधन दिले जाते. कोरोना काळापासून जिल्ह्यात वृद्ध कलावंतांचे सुमारे ८०० प्रस्ताव प्रलंबित आहेत. निवड समितीने निर्णयच न घेतल्याने या सर्वांना मानधनापासून वंचित राहावे लागत आहे. हे प्रस्ताव कलावंतांनी जुन्या नियमानुसार दाखल केलेले असल्यामुळे, समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी यांनी निवडणूक आचार-संहिता लागण्यापूर्वी ते प्रस्ताव जुन्या निकषाप्रमाणेच मंजूर करावे, असा आग्रह यावेळी करण्यात आला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article