>> मेघना साने
लेखन कला, संगीत कला, नाटय़ कला, नृत्य कला, चित्रकला अशा अनेक कलांचे वरदान लाभलेले नामवंत लेखक, कवी, नाटककार रवींद्रनाथ टागोर. परंतु हा अवलिया मनाच्या एका कोपऱ्यात कायम दुःख घेऊन वावरत होता याची आजूबाजूच्या लोकांना कल्पना येत नव्हती. मात्र आपल्या मनातील गोष्टी कुणाशी बोलाव्या असे जवळचे त्यांच्यापाशी कुणी उरले नव्हते. होती ती फक्त शब्दसखी. ती मात्र आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांना साथ देत होती.
ठाकूर घराण्यातील श्रीमंत कुटुंबात जन्मलेले रवींद्रनाथ एक नामवंत लेखक, कवी, नाटककार म्हणून नावारूपाला आले. त्यांच्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाला नोबेल पुरस्कार मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे सन्मान झाले. व्याख्यानांसाठी, मुलाखतींसाठी त्यांना देशोदेशीची आमंत्रणे येऊ लागली. त्यांच्या कवितांवर मोहीत झालेले वाचक, रसिक, कवी, कवयित्री त्यांना त्यांच्या जीवनप्रवासात भेटत गेले. तरीही एखाद्या शापित राजकुमाराप्रमाणे त्यांचे आयुष्य हे ‘एकला चलो रे’ असेच राहिले. लेखन कला, संगीत कला, नाटय़ कला, नृत्य कला, चित्रकला अशा अनेक कलांचे वरदान लाभलेला हा अवलिया मनाच्या एका कोपऱ्यात कायम दुःख घेऊन वावरत होता. याची आजूबाजूच्या लोकांना कल्पना येत नव्हती. कारण निसर्गाशी एकरूप असलेल्या या माणसाच्या चेहऱ्यावर कायम प्रसन्नताच दिसायची. मात्र आपल्या मनातील गोष्टी कुणाशी बोलाव्या असे जवळचे त्यांच्यापाशी कुणी उरले नव्हते. होती ती फक्त शब्दसखी. ती मात्र आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांना साथ देत होती.
‘एकला चलो रे’ ही शुभांगी भडभडे यांनी लिहिलेली चरित्रात्मक कादंबरी रवींद्रनाथ टागोर (ठाकूर) यांचे व्यक्तिमत्त्व नेमकेपणे उभे करते. देवेंद्रनाथ ठाकूर व शारदादेवी यांचे चौदावे अपत्य रवींद्रनाथ. लहानपणी त्याला रोबी नावाने हाका मारत. हा मुलगा शाळेच्या शिस्तीला आणि शिक्षेला नापसंत करून पलायन करून थेट घरी आला. घरी शिक्षक ठेवून वडिलांनी त्याचे शिक्षण होईल असे पाहिले. बारा वर्षांच्या रोबीला ते हिमालय दर्शन करायला घेऊन गेले. चारधाम यात्रा करावी असा त्यांचा उद्देश होता. या काळात रोबीला सोबत ठेवून देवेंद्रनाथांनी त्याची निसर्गाशी ओळख करून दिली. तसेच संस्कारांचेही शिक्षण दिले. यामुळे रोबीच्या अनुभवकक्षा रुंदावल्या. रोबी तरुण झाल्यावर योग्य वेळी त्याचा विवाह झाला, पण त्याचे विश्व केवळ घर हेच राहू नये म्हणून वडिलांनी त्याला जमीनदारीच्या कामावर पाठवले. सारा वसुली, हिशेब ठेवण्याचे काम जरी असले तरी पद्मा नदीच्या किनारी आणि बंगालमध्ये जेथे जेथे त्यांचा जमीनजुमला आहे, तेथे तेथे फिरायचे होते. या काळात रवीबाबूंनी दीन दुखितांचे जीवन जवळून पाहिले. पद्माकाठचा मुक्त रानवारा, हिरवं रान, वेगवेगळ्या सुमधुर ओळी गाणारे पक्षी, निरभ्र आकाशाखाली येणारे कृष्णमेघ, हिरवी कंच ओली धरती हे सर्व त्यांच्या कवीमनाला उभारी देणारेच होते. निसर्गाची भाषा त्यांच्या लेखणीतून उतरून आली. रवींद्रनाथांना घडविण्यात देवेंद्रनाथ यांचा पिता म्हणून मोलाचा वाटा आहे. वडील, वडीलबंधू ज्योतींद्रनाथ, सत्येंद्रनाथ, ज्ञानरंजनी वहिनी हे सारेच त्यांचे आदर्श होते.
‘भारती मासिक पत्रिके’त लिखाणाची सुरुवात करणारा रवींद्रनाथ हा कवी पुढे युरोपमधूनही शिक्षण घेऊन आला. ‘बनफूल’, ‘प्रभात संगीत’, ‘सांध्यसंगीत’ असे एकसे एक कवितासंग्रह तसेच ‘भग्नहृदय’, ‘रुद्रचंदन’, ‘कालमृगया’ अशा सुंदर सुंदर नाटकांचे लेखन करू लागला. लेखिका शुभांगी भडभडे यांनी ‘एकला चलो रे’ या कादंबरीत रवींद्रनाथांच्या आयुष्यातील घटना आणि त्याच सुमारास त्यांनी लिहिलेले ग्रंथ यांचा संबंध दाखवून दिला आहे. उदा- रवींद्रनाथांच्या पहिल्या कन्येचा जन्म 1886 साली झाला. त्याच वर्षी त्यांचा ‘कोदी ओ कोमल’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. पुढे त्यांना चार अपत्ये झाली. त्या काळात ‘विद्या अभिशाप’, ‘छोटो गोल्पो’, ‘विचित्र गोल्पो’, ‘कथा चातुष्टय़’ अशा मुलांसाठी असलेल्या पुस्तकांचे लिखाण केले. बालपणीच पाहिलेला आईचा मृत्यू, त्यांच्या लग्नानंतर झालेली कादंबरी वहिनीची आत्महत्या या दुःखद घटनांना उरात कोंडून आपल्या परिवाराबरोबर त्यांचे आयुष्य बऱयापैकी प्रवाहित झाले होते. या काळात (1894) ‘चैत्राली’, ‘चित्रा’, ‘नदी’ या काव्यसंग्रहांचे प्रकाशन झाले.
रवींद्रनाथांना शांतिनिकेतन या आधुनिक विचाराच्या शिक्षणप्रणालीने झपाटले होते. ती त्यांची स्वतची कल्पना होती. देवेंद्रनाथांची शांतिनिकेतन ही ध्यान करण्याची जागा गावापासून दूर होती. तेथे विद्यार्थ्यांना मुक्तपणे आकाशाखाली, झाडाखाली शिक्षण घेत आपल्या कलागुणांचा विकास करता यावा यासाठी रवींद्रनाथांनी या जागेवर ‘शांतिनिकेतन’ हे शिक्षण केंद्र उभे केले. या कल्पनेला सुरुवातीला गावातील लोकांनी विरोध केला. मात्र रवींद्रनाथांनी त्या जागी स्वत राहून मोठय़ा कष्टाने त्याचा विकास केला. मुले स्वयंपूर्ण होऊन शिकतील अशी त्यांची योजना होती. शांतिनिकेतनमध्ये तयार झालेल्या वस्तूंना बाजार पेठ मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. सुरुवातीला फक्त गरिबांचीच मुले राहण्यासाठी व शिकण्यासाठी येत होती. पण पुढे पंडित नेहरूंनीही काही काळ आपल्या कन्येला येथे शिक्षण घेण्यास पाठविले. शांतिनिकेतनच्या उभारणीचे शिवधनुष्य पेलत असताना त्यांच्या पत्नी मृणालिनीचा मृत्यू झाला. मुलांचेही मृत्यू रवींद्रनाथांना पाहावे लागले. त्यांचे वडील, मग भाऊ एकामागे एक मृत्यू पावले. नंतर जवळचे सहकारी, त्यांच्या साहित्याचा अनुवाद करणारी जर्मनीतील लेखिका हेलेन हे जग सोडून गेली. त्यामुळे आपला जीवनप्रवास एकटय़ानेच होणार आहे याची त्यांना कल्पना येत गेली. सदर कादंबरीतील निवेदन प्रथमपुरुषी नसले तरी ही कादंबरी रवींद्रनाथांच्या मनातून प्रवास करते. समाजात काय घडत आहे आणि त्याबद्दल रवींद्रनाथांना काय वाटते, ते काय विचार करत असतील हे लेखिका कल्पनेने लिहिते. पुढे घडणाऱ्या घटनांवरून त्याची साक्षही पटते. कादंबरीत इतिहासातील अनेक सत्य घटना येतात. परंतु त्या केवळ इतिहास सांगण्यासाठी नसून रवींद्रनाथांचे व्यक्तिमत्त्व रेखाटण्यासाठी येतात.
इंग्रजांनी दिलेली ‘सर’ ही पदवी त्यांनी परत केली. 1921 साली महात्मा गांधीजींची असहकार चळवळ जोरात सुरू होती. बंगालमधील चळवळीचे नेतृत्व रवींद्रनाथांनी करावे असे सूचित करण्यासाठी गांधीजी त्यांना भेटायला आले होते, पण रवींद्रनाथांना केवळ चरखा चालवून स्वातंत्र्य मिळेल असे वाटत नव्हते. लाखो रुपयांचे परदेशी कपडे जाळणे म्हणजे औद्योगिक क्रांतीला विरोध आहे असे वाटत होते. त्यामुळे रवींद्रनाथांनी चळवळीचे नेतृत्व करायला नकार दिला.
गांधीजींच्या अहिंसावादी चळवळीची बातमी जगभर पसरली होती. रवींद्रनाथ रोममध्ये एका भाषणासाठी गेले असताना इटलीचे पंतप्रधान मुसोलिनी यांनी त्यांना भेटीचे आमंत्रण दिले. राष्ट्रीय आंदोलनात रवींद्रनाथांचा सहभाग का नाही, याबद्दल मुसोलिनीने कुतूहल व्यक्त केले. तसेच अहिंसा, असहकार, सत्याग्रह या मार्गाने स्वातंत्र्य मिळविण्याबद्दल रवींद्रनाथांचे मत जाणून घेतले. रवींद्रनाथ म्हणाले, “बेनिटो, आम्ही देशभक्त अवश्य आहोत. पण स्वामी विवेकानंद जसे भारतीय संस्कृतीचा आदर्श ठेवायला सांगत आहेत, तसेच संस्कृतीचा परिचय देत संस्काराने नवा देश घडवावा या उद्देशाने आम्ही शांतिनिकेतनची स्थापना केली.’’ या कादंबरीत रवींद्रनाथांच्या काही बंगाली कवितांच्या ओळी आहेत. वैचारिकतेची झालर असली तरी ही कादंबरी त्यातील निसर्ग वर्णनाने आणि साहित्याने काव्यमय ठरते.