Published on
:
03 Feb 2025, 5:07 am
Updated on
:
03 Feb 2025, 5:07 am
पालघर : पालघर जिल्ह्यात अवैध धंद्यान विरोधात आवाज उठवणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अलीकडेच डहाणू तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचे हत्या प्रकरण ताजे असतानाच जव्हार तालुक्यातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय घोलप यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
जुगाराच्या अड्डा चालविणाऱ्या लोकांची तक्रार केल्याने जुगार अड्डा चालवणाऱ्या व त्याशी संबंधित असणाऱ्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. या गंभीर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी निर्मला फर्नांडिस, फ्रान्सिस फर्नांडिस, मायकल फर्नांडिस, नीलम फर्नांडिस, ज्योती फर्नांडिस, कलीम काझी व त्याची पत्नी या सातही जणांना ३० जानेवारी रोजी अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरणाचा मुद्दा समोर आला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास घेत छडा लावला असता अशोक धोडी यांचा खून झाल्याचे निदर्शनास आले. बाजारातील अवैध दारू धंद्यांच्या वादावरून त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातो. याच पार्श्वभूमीवर जव्हार तालुक्यातही एका ठिकाणी जुगार अड्डा सुरू होता. येथील शिव- सेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय घोलप यांनी सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी पुढाकार घेत यासंदर्भात जुगार अड्डा चलविणाऱ्यांची जव्हार पोलिसात नुकतेच तक्रार दिली होती.
जव्हार परिसरात बिलाडी नामक हा जुगार सुरू होता. हा बिलाडी जुगार बंद करावा म्हणून घोलप यांनी जव्हार पोलीस ठाणे यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जाच्या वादातून निर्मला घाटाळ उर्फ फर्नांडिस, फ्रान्सिस फर्नांडिस, मायकल फर्नांडिस, नीलम फर्नांडिस, ज्योती फर्नांडिस, कलीम काझी व कलीम काजी याची पत्नी (सर्व रा. डॅम आळी, जव्हार) यांनी घोलप यांच्या कृतीचा राग मनात ठेवून घोल यांच्या गांधी चौक येथील जुन्या घराजवळ जमून २९ जानेवारी रोजी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या मारहाणीत घोलप यांची सहा तोळ्याची सोन्याची चेन गहाळ झाली व त्यांना दुखापत झाली. यानंतर घोलप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सातही जणांवर खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पालघर जिल्ह्यात अवैध धंद्यांना सध्या ऊत आला आहे. सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी अवैध धंद्याविरोधात आवाज उठवणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. याच प्रकारातून सख्ख्या भाऊने डहाणूतील अशोक धोडी यांची हत्या केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर जव्हार येथे घोलप यांच्यावर हल्ला झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. राजरोस सुरू असलेल्या अशा अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी यानिमित्ताने होत आहे.