शेणखताला आला सोन्याचा भावFile Photo
Published on
:
19 Jan 2025, 8:21 am
Updated on
:
19 Jan 2025, 8:21 am
टाकळी भीमा: शेती वाचवण्यासाठी, शेतजमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखताचा वापर महत्त्वाचा असून, शेतकरी मिळेल त्या किमतीला शेणखत विकत घेऊ लागले आहेत. शिरूर तालुक्यातील विविध गावांतील शेतकर्यांकडून शेणखताला मागणी वाढली आहे.
जनावरांना लागणारी वैरण, सुग्रास, पेंड आणि औषधे, मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामानाने दुधाचे दर वाढत नाहीत. दूध धंदा परवडत नसल्यामुळे शेतकर्यांनी जनावरे पाळणे कमी केले. आता तर गाई, म्हशीचे दर गगनाला भिडले आहेत.
परिणामी गाई, म्हशींपासून मिळणारे शेणखत बंद झाले. याचा फटका शेतीला बसला आहे. शेतकर्यांना शेणखताचे महत्त्व लक्षात आले असून पुन्हा मिळेल तिथून आणि मिळेल त्या किमतीत शेणखत विकत घेऊन ते शेतात टाकले जात आहे.
एक ट्रक शेणखत शेतात पांगविण्यासाठी मजुरांना 2 हजार रुपये, शेणखताची किंमत 7 हजार रुपये, शेणखत ट्रॅक्टर भरण्यासाठी 1500 रुपये मजुरी, असा 10 हजार 500 रुपये खर्च होतो. खताचा ट्रेलर 10 हजाराला विक्री होतो, तर शेणखताचा ट्रक 17 ते 18 हजार रुपयांना मिळतो, अशी माहिती टाकळी भीमा येथील ट्रॅक्टर मालक योगेश काळे, राम पाटोळे यांनी दिली.
या खताला ऊस उत्पादक शेतकरी, द्राक्ष बागायतदार व भाजीपाला पिके घेणार्या शेतकर्यांकडून मागणी वाढत आहे. बांधावर टाकलेले खत शेतात पसरवण्यासाठी मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मोठे शेतकरी केवळ दुभत्या गाई शेणखतासाठी पाळू लागले आहेत.
शेणखताच्या ट्रॉलीला दोन हजारांचा भाव
शिरूर तालुक्यात टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी, डिग्रजवाडी, विठ्ठलवाडी, दरेकरवाडी, तळेगाव ढमढेरे, दहिवडी, पारोडीपर्यंत अनेक लहान वाड्या- वस्त्यांपर्यंत जाऊन शेतकरी शेणखत गोळा करू लागले आहेत.