डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला.File Photo
Published on
:
24 Nov 2024, 12:25 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:25 am
सांगोला : सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होऊन शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख हे 25 हजार 384 मतांनी विजयी झाले. प्रसिद्धीझोतात असलेले शहाजी पाटील यांचा पराजय झाला. शेतकरी कामगार पक्षाचे स्व. आमदार गणपतराव देशमुख यांनी कार्यकर्त्यांची बांधलेली फळी अबाधित राहिली. याच एकजुटीचा फायदा डॉ. बाबासाहेब देशमुख यांना झाला. त्यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिशबाजी करीत गुलालाची उधळण केली. सांगोला शहरातून जंगी मिरवणूक काढली. कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद साजरा केला जात आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी तीन लाख 33 हजार 493 मतदार होते. यापैकी दोन लाख 60 हजार 589 मतदारांनी मतदान केले होते. मतमोजणीच्या दिवशी डॉ. बाबासाहेब देशमुख यांना एक लाख 16 हजार 280 मतदान मिळाले, तर शिवसेना शिंदे गटाचे आ. शहाजी बापू पाटील यांना 90 हजार 896 मतदान मिळाले व पराभव पत्करावा लागला आहे.शिवसेना उबाठा गटाचे दीपक साळुंखे-पाटील यांना 51 हजार 301 मते मिळाली. तेही पराभूत झाले आहेत.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या विजयानंतर सांगोला शहरातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मतमोजणीच्या ठिकाणी सकाळपासून मोठ्या प्रमाणात नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिशबाजी करत आनंद साजरा केला.