मच्छे : हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता विनोद केरुर यांच्याशी चर्चा करताना माजी आमदार मनोहर किणेकर, आर. एम. चौगुले, आर. के. पाटील, मोनाप्पा पाटील, प्रकाश नाईक, महादेव बिर्जे आदी. Pudhari File Photo
Published on
:
05 Feb 2025, 12:48 am
Updated on
:
05 Feb 2025, 12:48 am
बेळगाव : सुरळीत वीजपुरवठ्याच्या मागणीकडे हेस्कॉमने दुर्लक्ष केल्याने संतप्त शेतकर्यांनी मंगळवारी (दि. 4) मच्छेतील हेस्कॉम कार्यालयासमोर रास्ता रोको करुन बेळगाव-गोवा महामार्गा रोखून धरला. तीन तास चाललेल्या या आंदोलनानंतर हेस्कॉम अधिकारी नरमले. त्यांनी सलग सात तास थ्री फेज तर रात्री 12 तास सिंगल फेज वीजपुरवठा करण्याची ग्वाही दिली.
वाघवडे परिसरात सध्या दोन टप्प्यात थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे. शेतातील घरांना रात्री वीजपुरवठा केला जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सलग सात तास थ्री फेज वीजपुरवठा करावा. तसेच शेतातील घरांसाठी रात्री 6 ते सकाळी 6 या कालावधीत सिंगल फेज वीजपुरवठा करावा, अशी शेतकर्यांची मागणी आहे. याबाबत आठ दिवसांपूर्वी निवेदन दिले होते. तसेच आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आंदोलन छेडण्यात आले.
बेळगाव तालुक्यातील वाघवडे, संतिबस्तवाड, झाडशहापूर, बाळगमट्टी, किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, नावगे परिसरातील शेतकर्यांनी प्रारंभी हेस्कॉम कार्यालयासमोर दोन तास धरणे धरले. आंदोलनात तालुका म. ए. समितीचे नेते सहभागी झाले होते. प्रारंभी माजी एपीएमसी सदस्य आर. के. पाटील यांनी प्रास्ताविक करुन शेतकरी व विद्यार्थ्यांच्या अडचणीची माहिती दिली. माजी आमदार मनोहर किणेकर, रमाकांत कोंडुसकर यांनीही मार्गदर्शन केले. हेस्कॉम अधिकार्यांनी निर्णय न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. त्यानुसार एक वाजता रास्ता रोकोला सुरुवात करण्यात आली.
आंदोलनाची माहिती मिळताच हेस्कॉम ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद केरुर यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकर्यांशी चर्चा केली. सात तास थ्री फेज वीजपुरवठा करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, रात्रीच्यावेळी सिंगल फेज वीजपुरवठ्याचा कृषी पंपांसाठी वापर होत असल्याचा आरोप केला. त्याला शेतकर्यांनी आक्षेप घेतला. अखेरीस नेत्यांबरोबर चर्चा करुन सिंगल फेज वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी ता. म. ए. समिती कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, अॅड. प्रसाद सडेकर, उद्योजक सुनील तिरोडकर, कर्ले ग्रा. पं. सदस्य विनायक पाटील, अनिल पाटील, रयत संघटनेचे नेते प्रकाश नाईक, पीयूष हावळ, दत्ता उघाडे, मोनाप्पा पाटील, महेश जुवेकर, मार्कंडेय कारखान्याचे संचालक जोतिबा आंबोळकर, महादेव बिर्जे, कल्लाप्पा पाटील, युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणयेकर, निंगाप्पा मोरे, सागर सावगावकर, बाळाराम शहापूरकर, रघुनाथ देसाई, सोपान नाईक आदीसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनानंतर हेस्कॉम अधिकार्यांनी शेतकर्यांच्या मागण्या मान्य केल्या. परंतु, येत्या दोन दिवसात वरिष्ठ अधिकार्यांबरोबर शेतकर्यांची बैठक घेऊन वीजपुरवठ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन हेस्कॉम अधिकार्यांनी दिले.
शेतकर्यांनी अचानक रास्ता रोकोचा निर्णय घेतल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. बेळगावहून गोव्याकडे जाणारी रहदारी हुंच्चेनहट्टीमार्गे वळविण्यात आली. तर गोव्याकडून येणारी रहदारी व्हीटीयू क्रॉस येथून संतिबस्तवाडमार्गे वळविण्यात आली.