शरद कृषी महोत्सवाचे उद्घाटन करताना राजेंद्र पवार शेजारी डॉ. नितीन सावंत, सचिन यादव व इतर.Pudhari Photo
Published on
:
03 Feb 2025, 12:41 am
Updated on
:
03 Feb 2025, 12:41 am
लोणंद : शेती यापुढे धोपट मार्गाने करून चालणार नाही. कुटुंबाचा सर्वच खर्च वाढत चालला आहे म्हणूनच शेतीतून पैसा निघालाच पाहिजे. त्यासाठी शरद कृषी प्रदर्शनासारखी कृषी प्रदर्शने भरवून शेतीविषयक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून पिके घ्यावी लागणार आहेत. तरच शेतीचा उत्पादन खर्च कमी होवून उत्पादनात वाढ होणार आहे. शेतीत टिकायचे असेल तर एआय टेक्नॉलॉजीशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन कृषी विकास प्रतिष्ठानचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी केले.
लोणंद येथील बाजार तळावरील मैदानावर डॉ. नितीन सावंत विचार मंचच्यावतीने दि. 1 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित शरद कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, वाई विधानसभा अध्यक्ष व महोत्सवाचे निमंत्रक डॉ. नितीन सावंत, केबी एक्सफोर्टचे सचिन यादव, सतीश कोंडे, विक्रम कड, माजी नगरसेविका लता नरुटे, शैलजा खरात, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अजित यादव, सुनिल यादव, रघुनाथ शेळके, चंद्रकांत शेळके, डॉ. शुभदा सावंत, हेमलता निंबाळकर, बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष उत्तमराव सावंत, कौशल्या सावंत, किसनराव धायगुडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्र पवार म्हणाले, येथील पाडेगाव संशोधन केंद्रावर लोकांचा विश्वास असून उसाच्या नवनवीन जाती पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने चांगल्या प्रकारे विकसित केल्या आहेत. या संशोधन केंद्राला सरकारने चांगली आर्थिक मदत करण्याची गरज आहे. एआय टेक्नॉलॉजी श्रीमंतांचे काम आहे, असे समजायचे कारण नाही. भविष्यात सर्व क्षेत्रांमध्ये टेक्नॉलॉजी येणार आहे. त्याला फार वेळ लागणार नाही. प्रतापराव पवार व त्यांचे सहकारी काही कंपन्यांना विनंती करून एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेती करण्यासाठी शेतकर्यांना फंड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या टेक्नॉलॉजीमध्ये उसाचे उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही तर खर्च निम्म्याने कमी होणार आहे. यावर अजूनही संशोधन होण्याची गरज आहे. आगामी अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री ना. अजित पवार एआयसाठी मोठा निधी उपलब्ध करून देणार आहेत. या गोष्टी सहज घेऊन चालणार नाहीत, त्या आपल्याला स्वीकाराव्या लागतील. शेतीत जगायचं, टिकायचं असेल तर ही टेक्नॉलॉजी घ्यावीच लागेल. या टेक्नॉलॉजीशिवाय पर्याय नाही. या टेक्नॉलॉजीपासून कांदा, ऊस, आधी पिकांमध्ये मोठे उत्पन्न काढता येणार आहे, असेही ते म्हणाले.
डॉ.नितीन सावंत म्हणाले, शरदचंद्र पवार यांच्या प्रेरणेतून हा महोत्सव सुरू झाला. यामध्ये प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. शेती करताना आधुनिकतेची जोड मिळावी व शेतकर्यांना नवनवीन तंत्रज्ञान अवगत व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतीसाठी काय केले पाहिजे याची माहिती लोकांना या प्रदर्शनात मिळत असतेे. यापुढील काळात एआय तंत्रज्ञानामुळेच शेती टिकणार आहे.
यावेळी सुनील माने, विक्रम कड यांनी मनोगत व्यक्त केले. गिरीश बनकर यांनी प्रास्तविक केले. यावेळी के. के. गायकवाड, राजेश शिंदे, स्वप्नील क्षीरसागर, महेंद्र गाढवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, कृषी क्षेत्रात योगदान देणार्या सचिन यादव यांना शरद कृषी उद्योजक तर सतीश कोंडे यांना शरद कृषी रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच डॉ. नितीन सावंत यांच्या कल्पक विचारातून शेतकर्यांसाठी भविष्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यासाठी कृषी संस्कृती व संपत्तीचा नवा अध्याय असणार्या ‘कृष्णामाई’ या लोगोचे अनावरण राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.