Published on
:
05 Feb 2025, 1:00 am
Updated on
:
05 Feb 2025, 1:00 am
सोलापूर : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शासनाकडून दोन गणवेश मोफत दिले जातात. यंदाच्या वर्षी मात्र पहिला गणवेश दिल्यानंतर दुसर्या गणवेशाचे वाटप शैक्षिणक वर्ष संपतेवेळी होत आहे. आतापर्यंत 93 टक्के विद्यार्थ्यांचे गणवेश शिवून तयार झाले आहेत. त्यातील 75 टक्के गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे.
चालू शैक्षणिक वर्षात गणवेश देण्याचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीकडे न देता महिला आर्थिक विकास महामंडळाकडून शिवून घेऊन गणवेशाचे वाटप करण्यात येत असल्याने गणवेश देण्यास विलंब लागत आहे. जिल्ह्यातील एक लाख 91 हजार 758 विद्यार्थी गणवेशासाठी पात्र आहेत. त्यातील सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या गणवेशाचे वाटप केले आहे. दुसर्या गणवेशाची विद्यार्थी वाटप पाहत आहेत. पुढील आठवड्यात सर्वच विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे.
दरम्यान, पुढील शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्याना तत्काळ गणेवश उपलब्ध व्हावेत, यासाठी शासनाने शालेय व्यवस्थापन समितीस गणवेशाचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना शाळा सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच गणेवश मिळणार आहेत.
जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दुसर्या गणवेशाचे वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत 93 टक्के गणेवश शिवून पूर्ण झाले आहेत. त्यातील 75 टक्के गणवेशाचे वाटप झाले आहे. पुढील काही दिवसांत सर्व विद्यार्थ्यांना दुसरा गणेवश देण्यात येईल.
- कादर शेख, शिक्षणाधिकारी, प्राथमिक