संगमनेर शहर : आश्वीतील अप्पर तहसील कार्यालयाच्या प्रस्तावावरून आजी माजी आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विद्यमान आमदार अमोल खताळ यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबत कोणताही निर्णय झालेला नसताना गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप केला. मात्र दुसरीकडे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट सहीचे पत्रच दाखवित संगमनेरच्या फाळणीचा प्रस्ताव हा फक्त तहसील कार्यालया पुरता मर्यादित राहिलेला नाही, आता हा प्रस्ताव थेट जिल्हाधिकारी, आयुक्त कार्यालय ते मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचे पुरावेच जनतेसमोर ठेवले आहेत. त्यामुळे हा राजकीय संघर्ष तापलेला पहायला मिळत आहे.
संगमनेरच्या फाळणीचा प्रस्ताव हा फक्त तहसील कार्यालया पुरता मर्यादित राहिलेला नाही, आता हा प्रस्ताव थेट जिल्हाधिकारी, आयुक्त कार्यालय ते मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचे पुरावे पुढे आणताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहीचे पत्रच कार्यकर्त्यांच्या बैठकीतच दाखविले. अवघ्या चार ते पाच दिवसात संगमनेर तोडण्याचा कुटील डाव काही मंडळींनी साधल्याची टीकाही त्यांनी केली.
स्वतंत्र अप्पर तहसील निर्मितीच्या संदर्भात भूमिका घेण्यासाठी तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शेतकी सहकारी संघ येथे बैठक आयोजित केली होती. त्यावेळी थोरात यांनी सह्यांचा कागद कार्यकर्त्यांना दाखवला.
यावेळी आर.बी. रहाणे, शेती संघाचे अध्यक्ष संपतराव डोंगरे, सरपंच भाऊराव रहाणे, विजय राहणे, लक्ष्मणराव कुटे, रमेश गुंजाळ, शांताराम कढणे, नानासाहेब कढणे, नाना राहणे, कैलास सरोदे, बालम सरोदे, उज्वला राहणे, सुरेश थोरात, अर्चनाताई बलोडे, पद्मताई थोरात, रवी सरोदे आदीं उपस्थित होते.