मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबटय़ाची सफारी सुरू होणार आहे. या प्रकल्पाला सुमारे पाच कोटी रुपये खर्च येणार आहे.
मुंबई उपनगर पालकमंत्री आशीष शेलार यांनी आज बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पाहणी दौरा केला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सध्या वाघ आणि सिंहाच्या दोन सफारी उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागांत बिबट्यांचे सापडलेले बछडे याच उद्यानात संरक्षित करण्यात आलेले आहेत. त्यांचे पालन करण्यात येत आहे. मात्र पर्यटकांना पाहण्यासाठी त्यांची सफारी उपलब्ध नाही. त्यासाठी सुमारे तीस हेक्टर जागा लागणार असून ही जागा या क्षेत्रात उपलब्ध आहे. तर सफारीसाठी प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती या वेळी अधिकाऱयांनी दिली. या राष्ट्रीय उद्यानाला वर्षभरात 20 लाख पर्यटक भेट देतात. जर बिबटय़ाची सफारी उपलब्ध झाली तर पर्यटकांची संख्या वाढेल व त्यातून वनक्षेत्राचे उत्पन्न वाढेल, अशी माहिती देऊन मुख्य वनरक्षक जी मल्लिकार्जुन यांनी मंत्र्यांसमोर सादरीकरण केले.
पर्यटकांची संख्या वाढणार 400 कर्मचाऱयांना विमा कवच
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 400 वन मजूर असून ते ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता तसेच वन्य प्राण्यांचा अधिवास असलेल्या क्षेत्रात स्वतःचा जीव धोक्यात घालून सतत गस्तीचे काम करतात. यातील बहुसंख्य हे आदिवासी आहेत.
11 जणांची टीम
मानवी वस्तीमध्ये वन्य प्राणी घुसल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी जाणारी 11 जणांची टीम असून या सगळ्यांचा प्राण्यांशी थेट संपर्प येतो. मात्र या सगळ्यांचा सुरक्षा विमा उतरवण्यात आलेला नाही, ही बाब आशीष शेलार यांच्या निदर्शनास आली तेव्हा या सगळ्यांचा सुरक्षा विमा उतरवण्याचे आदेश दिले.
भारत, भारतीला घेतले दत्तक!
या उद्यानात ‘भारत आणि भारती’ हे तीन वर्षांचे दोन सिंह नुकतेच गुजरातमधून आणण्यात आले आहेत. त्यांना वर्षभरासाठी मंत्री आशीष शेलार यांनी दत्तक घेतले असून त्यांच्या पालनपोषणासाठी होणारा खर्च ते वैयक्तिकरित्या करणार आहेत.