Published on
:
01 Feb 2025, 1:45 am
Updated on
:
01 Feb 2025, 1:45 am
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचल्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने मुंबई पोलिस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक अर्थात ‘एसआयटी’ची स्थापना केली आहे. गृह विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला.
महिनाभरापूर्वी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या कटाच्या चौकशीची मागणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली होती. त्यावर, या कटाचा तपास करण्यासाठी ‘एसआयटी’ स्थापन करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार, मुंबई पोलिस दलातील कायदा-सुव्यवस्थेचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आली आहे. चौधरी यांच्यासह राज्य राखीव पोलिस दल मुंबईचे उपमहानिरीक्षक राजीव जैन, मुंबईतील पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे आणि मुंबईतील सहायक पोलिस आयुक्त आदिकराव पोळ यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिंदे-फडणवीसांच्या अटकेसाठी रचण्यात आलेला कट, त्यासाठी खोट्या गुन्ह्याच्या तपासाचा रचलेला बनाव, याची या ‘एसआयटी’मार्फत चौकशी केली जाणार आहे. याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करून त्याबाबत शासनाला शिफारस करण्याच्या सूचना विशेष तपास पथकाला देण्यात आल्या आहेत. तसेच, या प्रकरणात विधिमंडळात झालेल्या चर्चेदरम्यान विविध आमदारांनी केलेले दावे, उपस्थित केलेले मुद्दे तपासादरम्यान ‘एसआयटी’ने विचारात घ्यायचे आहेत. आमदारांना याप्रकरणी आणखी काही मुद्दे मांडायचे असतील, पुरावे सादर करायचे असतील, तर त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ‘एसआयटी’ला आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा पुरविण्याची जबाबदारी मुंबई पोलिस आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस, शिंदे या दोन्ही नेत्यांना अडवण्याच्या बोलीवर संजय पांडे यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावर आणल्याचे आरोपही झाले. या कटाच्या अंमलबजावणीची जबाबदारी तत्कालीन पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्या अनुषंगाने पाटील यांनी तपासही चालविला होता. या सर्व प्रकरणाची आता ‘एसआयटी’मार्फत चौकशी केली जाणार आहे.