बोगमाळो : सुरू असलेले खोदकाम. Pudhari File Photo
Published on
:
01 Feb 2025, 1:36 am
Updated on
:
01 Feb 2025, 1:36 am
वास्को : दाबोळी-बोगमाळो चौकापासून काही अंतरावर शुक्रवारी रस्त्याकडेला खोदकाम करताना तेथील इंधनवाहिनी फुटली. त्यातून मोठ्या आवाजात निघणार्या वायूमुळे आसपासच्या नागरिकांमध्ये घबराट पसरली. खबरदारीची उपाययोजना म्हणून वाहतूक पोलिस व वास्को पोलिसांनी त्या मार्गावरील वाहतूक बंद करून ती अन्यमार्गाने वळविली. सुदैवाने ती इंधनवाहिनी रिकामी असल्याने काही वेळाने वाहतूक सुरळीत करण्यात आली. सदर वाहिनी दुरुस्त करून तिची चाचणी घेण्यास चारपाच दिवसांचा कालावधी लागणार आहे.
चिखली बोगमाळो चौकात सध्या उड्डाणपूल, रस्ता विस्तारीकरण, जलवाहिनीचे काम सुरू आहे. खोदकाम करताना संबंधित कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळे वाहिन्यांची मोडतोड झाली असा दावा करण्यात येत आहे. तेथील रस्ता रुंदीकरण व युटिलिटी गटार बांधण्यासाठी रस्त्याकडेला खोदकाम करण्यात येत आहे. त्यासाठी तेथे मोठ्या अर्थ मूव्हर्सचा वापर करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी एका ठिकाणी खोदकाम करीत असताना जमिनीखाली असलेल्या इंधनवाहिनीला नुकसान पोहचले. त्या इंधनवाहिनीला मोठा तडा गेल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात वायू बाहेर येऊ लागला. त्यामुळे तेथे काम करणार्या कामगारांची व इतरांची धावपळ उडाली.
याप्रकरणी माहिती मिळताच पोलिस, वाहतूक पोलिस, गोवा अग्निशमन दल आदी यंत्रणा तेथे पोहचली व तत्काळ खबरदारीची उपाययोजना म्हणून तेथील वाहतूक बंद करण्यात आली. सदर वाहतूक चिखली मार्गे, विशाल मेगा मार्ट व इतर मार्गाने वळविण्यात आली. एकंदर परिस्थितीचे आकलन न झाल्याने तेथील आसपासच्या रहिवाशांमध्ये तसेच वाहनचालकांत भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान झुआरी इंडियन ऑयल टँकिंगच्या आगारात माहिती मिळताच सरव्यवस्थापक श्रीप्रसाद नाईक व इतर तेथे पोहचले. त्यांनी त्या इंधन वाहिनीची पाहणी केली. त्या इंधनवाहिनीला मोठा तडा गेला असला तरी सुदैवाने आज त्यातून इंधन वाहून नेण्यात येत नसल्याचे नाईक यांनी सांगितले. त्यांनी तेथे कोणताही धोका नसल्याचे मामलेदार पंडित यांना सांगितल्यावर तेथील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
चाचणीसाठी वाहिनीत भरली हवा
इंधनवाहिनीला हानी पोहोचू नये यासाठी तेथे आम्ही एक सुरक्षारक्षक ठेवला होता. इंधनवाहिनी जमिनीखालून गेल्याचे समजण्यासाठी तेथे सिमेंटचे ब्लॉक उभारले होते. परंतु खोदकाम करताना संबंधितांनी सुरक्षारक्षकाचे न ऐकता शेवटी त्या इंधनवाहिनीची मोडतोड केली. शनिवारी ऑयल टँकर जहाज येणार असल्याने आम्ही या इंधनवाहिनीची चाचणी करण्यासाठी त्यामध्ये हवा भरली होती. जेणेकरून तिची कोठे हानी वगैरे झाली नाही ना हे समजण्यास मदत होते. त्यामुळे जेव्हा इंधनवाहिनीला तडा गेला तेव्हा त्यामध्ये हवा होती. ती वेगाने बाहेर पडू लागली. याप्रकरणी आम्हाला अलर्ट मिळाला होता, असे सरव्यवस्थापक श्रीप्रसाद नाईक यांनी सांगितले.
वाहिनी दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करणार
सध्या आगरात आठ दहा दिवस पुरेल एवढा इंधनाचा साठा आहे. त्यामुळे इंधन टंचाई होण्याची शक्यता नाही. सदर वाहिनीच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी चार पाच दिवस लागतील. त्यानंतर चाचणी केल्यावर या वाहिनीतून इंधन वाहून नेले जाईल, असे सरव्यवस्थापक श्रीप्रसाद नाईक यांनी सांगितले.