Published on
:
01 Feb 2025, 1:36 am
Updated on
:
01 Feb 2025, 1:36 am
पणजी : बारावीच्या परीक्षेच्या काळात जुना मांडवी पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे.
बारावीच्या परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून शनिवारी 1 फेब्रुवारीपासून मांडवीवरील जुना पूल 15 दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. या काळात नव्या पुलावरून सगळी वाहने धावणार आहेत. दरम्यान, एक पूल बंद असल्याचा अधिक त्रास तिसवाडी आणि बार्देश तालुक्यातील विद्यार्थ्यांना होऊ शकतो. दोन्ही तालुक्यात परीक्षा केंद्रे असली, तरी म्हापसा, पर्वरी, कळंगुट या भागातील अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे ही पणजी व कुजिरा येथे आहेत. तिसवाडीतील काही विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे ही म्हापसा येथे आहेत.
सकाळी 10 पर्यंत वाहतूक रोखू नका : शेट्ये
मांडवीवरील दुसरा पूल आणि वरचा अटल सेतू वाहतुकीस खुला राहणार असला तरी या पुलांवर ताण पडणार असल्यामुळे वाहतूक खोळंबली जाऊ शकते. अटल सेतूवर दुचाकी वाहतुकीला परवानगी नाही. त्यामुळे फक्त नव्या मांडवी पुलाचा आधार असेल.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सबंधित विभागाला याविषयी पत्र लिहून परीक्षेच्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत त्या पुलावरील वाहतूक न रोखण्याची विनंती केली जाणार असल्याचे शालान्त परीक्षा मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांनी सांगितले.