संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. तो कुठे आहे? त्याचं काय झालं? याची काहीच माहिती लागत नाहीये. 50 दिवसाहून अधिक काळ लोटला तरी कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलीस, एसआयटी आणि सीआयडी अपयशी ठरली आहे. त्यातच आता करुणा शर्मा यांनी एक विधान करून खळबळ उडवून दिली आहे. कृष्णा आंधळेचा खून झाला असावा असा संशय करुणा शर्मा यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
करूणा शर्मा यांनी मीडियाशी संवाद साधताना हा खळबळजनक दावा केला आहे. वाल्मिक कराडने मला मारहाण केली. धनंजय मुंडे यांच्यासमोरच मला मारहाण केली. माझ्या शरीराला त्याने कुठे कुठे हात लावला. तीन वर्षापूर्वी मी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. तिथेच हा प्रकार घडला होता. याबाबतचे मी सीसीटीव्ही फुटेज जिल्हाधिकारी कार्यालयाला मागितले. पण मला ते अद्यापही देण्यात आलेले नाही, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. तसेच तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यावरही कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
धनंजय मुंडेंचे आर्थिक घोटाळे बाहेर काढेन…
कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात फरार आहे. त्याची हत्या देखील झाली असावी . वाल्मिक कराडला शरण यायला जर इतके दिवस लागत असतील तर कृष्णा आंधळे याला देखील मारून टाकलं असेल, असा खळबळजनक दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. वाल्मिकचे बँकेत 100 खाती आहेत. त्याने बँकेच्या खात्यांमधून पैसा वळवला असेल. धनंजय मुंडे यांच्याकडे आका काही कमी नाही आहेत, त्यांच्याकडे अनेक आका आहेत. माझ्याकडे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात अनेक आर्थिक गडबडीची माहिती आहे. वेळ आली तर मी सगळी माहिती बाहेर काढेन, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
त्यांची नार्को टेस्ट करा
दरम्यान, भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. आका आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची नार्कोटेस्ट करण्याची मी मागणी केली आहे. कृष्णा आंधळे अद्यापही फरार असून आता अशोक मोहिते प्रकरणातील दोघेजण कर्नाटकमध्ये पकडले आहेत. ते कृष्णा आंधळेचे मित्र आहेत. म्हणजे आक्का आणि त्यांच्या गॅंगचा माज अजूनही संपलेला नाही. अजूनही अशोक मोहिते शुद्धीत नाहीत. या प्रकरणात कलम वाढ करायला हवी, अशी मागणी करतानाच कृष्णा आंधळे लवकरच सापडेल, असं सुरेश धस यांनी सांगितलं.