संशोधन : चिंता ‘जीएम मानवा’ची pudhari photo
Published on
:
17 Nov 2024, 12:45 am
Updated on
:
17 Nov 2024, 12:45 am
प्रा. विजया पंडित
जगात प्रथमच दक्षिण आफ्रिका सरकारने जनुकीय सुधारित (जीएम) मानव तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांना परवानगी दिली आहे. त्यासाठी भ्रूणसंबंधी नियमांत बदल केले आहेत. पिढ्यान्पिढ्या चालत येणार्या आजारातून कायमस्वरूपी सुटका मिळवण्याच्या नावाखाली हे पाऊल टाकले जात असले तरी तो निसर्गाच्या रचनेत मानवाने केलेला हस्तक्षेप असल्याचे मानले जाते.
अमरत्वाची ओढ मानवाला आदिम काळापासून आहे. पुराणकथांमध्येही अनेक असुरांनी देवांची प्रार्थना करून अमरत्व मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे संदर्भ आढळतात. आधुनिक काळातही अशा प्रकारचे प्रयोग छुप्या मार्गाने सुरू आहेत. यामध्ये मानवाच्या शरीरात असणार्या गुणसूत्रांच्या सर्पिल रचनेत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अलीकडेच जगाच्या इतिहासात प्रथमच दक्षिण आफ्रिका सरकारने जनुकीय सुधारित मानव तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांना परवानगी देत प्रयोगशाळेत कृत्रिम मानव निर्मितीचा मार्ग मोकळा करून दिला. दक्षिण आफ्रिकेने हे वादग्रस्त पाऊल टाकत भ्रूणसंबंधी नियमांत बदल केले. दक्षिण आफ्रिकेच्या नव्या आरोग्य दिशानिर्देशानुसार जिनोम एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर करत भ्रूणमध्ये बदल करता येणे शक्य आहे. एकीकडे मोहरी, कापूस, वांग्याच्या ‘जीएम’वरून वाद सुरू असताना दक्षिण आफ्रिकेचा नवा निर्णय या वादात भर घालणारा आहे.
पिढ्यान्पिढ्या चालत येणार्या आजारातून कायमस्वररूपी सुटका मिळवण्याच्या नावाखाली जीएम मानव तयार करण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर जागतिक पातळीवर खळबळ उडाली आहे. कारण अनुवांशिक बदल करणार्या या तंत्रज्ञानाचे दीर्घकालीन परिणाम होणार आहेत. तसेच नैतिक बाजूच्या आघाडीवरही याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहेत. आगामी काळात अनुवंशिक अभियांत्रिकीच्या नव्या युगाची सुरुवात होऊ शकते आणि त्याचा परिणाम मानवी परंपरा आणि संस्कृतीवर होऊ शकतो, असे मानले जात आहे. दक्षिण आफ्रिकेने या वादग्रस्त तंत्रज्ञानाला अधिमान्यता दिल्यास जगभरात त्याच्या वापरावरून जीवघेणी स्पर्धा सुरू होईल आणि या माध्यमातून थेट निसर्गालाच आव्हान दिले जाऊ शकते.
अर्थात दक्षिण आफ्रिकेने या नवप्रयोगाला कायदेशीर मान्यता दिली असली तरी या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा वापर 2018 मध्ये चीनमध्ये झाला. त्यावेळी गुणसूत्रांमध्ये संशोधन करून नव्या मार्गाने बाळांना जन्म दिल्याच्या बातम्या आल्या. यालाच ‘जेनेटिकली मॉडिफाईड’ किंवा डिझायनर बेबी’ अशी संज्ञा देण्यात आली. चीनने लावलेल्या या आश्चर्यकारक शोधाची तंत्रज्ञान आणि संधोधन जगातात बरीच चर्चा झाली होती.
डीएनएमध्ये काही विशिष्ट बदल करून एचआयव्ही आणि कॉलरासारख्या रोगांपासून मुक्त अशा बाळाचा जन्म झाल्याचा दावा संशोधकांनी केला होता. त्याआधी ब्रिटनमधील वैज्ञानिकांना मानवी भ्रूणाच्या डीएनए म्हणजेच जीन्समध्ये संशोधन करण्याची परवानगी मिळाली होती. त्यामागील हेतू मानवी जीवनाच्या सुरुवातीच्या काही क्षणांना जाणून घेणे हा होता. परंतु त्यावर पुढे काही काम करण्यात आले नाही. चीनमध्ये जन्मलेल्या डिझायनर बेबीचे पुढे काय झाले याचा थांगपत्ता अद्याप कोणालाही लागलेला नाही. कारण हा प्रयोग चीनने छुप्या मार्गाने केला.
आता दक्षिण आफ्रिकेच्या या निर्णयाने विज्ञानविश्वात नव्याने या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. या तंत्रज्ञानाला संपूर्ण मानवतेसाठी आव्हान मानले जात आहे. कारण या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बालके विकसित करण्याची स्पर्धा सुरू झाली तर मानवजातीपुढे अनेक प्रकारचे अनुत्तरित राहणारे प्रश्न निर्माण होऊ शकतात. शास्त्रज्ञांच्या मते, दक्षिण आफ्रिका सरकारला याचा वापर खूपच संयमाने आणि संवेदनशीलतेने करावा लागेल. कारण निसर्गाशी केलेली छेडछाड ही कदाचित महागात पडू शकते.
जीएम मानव तयार करण्याच्या चीनच्या प्रयत्नांवर ‘जिनोम एडिटिंग’वरील आंतरराष्ट्रीय शिखर संमेलनाच्या आयोजन समितीने आक्षेप घेत टीका केली होती. दक्षिण आफ्रिकेने ज्या नियमांनुसार संशोधन केले, त्यात सामाजिक भान राखणार्या जुन्या निकषांचा समावेश नाही. म्हणून जेव्हा दक्षिण आफ्रिकेने भू्रणामध्ये हस्तक्षेप करण्याची परवानगी शास्त्रज्ञांना दिली तेव्हा अनेक शंका बळावल्या.
या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर भ्रूणच्या तत्त्वांत हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भ्रूणामध्ये संशोधन करण्याच्या नावावर मानवी सभ्यतेशी देखील छेडछाड होऊ शकते. भविष्यामध्ये एखाद्या सिनेतारकेसारखी अथवा प्रसिद्ध दिसणार्या व्यक्तीप्रमाणे दिसणार्या बाळांची निर्मिती करण्याची मागणी केली जाऊ शकते. अनुवांशिक आजारपण संपविण्यात किती यश मिळेल, हे आगामी काळच सांगेल. परंतु गुणसूत्रांमध्ये बदल ही सर्वांत किचकट प्रक्रिया आहे. यात थोडीफार फेरफार झाली तर डिझायनर मुले तयार करणे किंवा आजारांपासून सुटका मिळवण्याऐवजी भलतेच काहीतरी हाती लागू शकते.
दक्षिण आफ्रिका सरकारच्या या निर्णयामुळे जगभरातील शास्त्रज्ञ काही प्रश्न उपस्थित करत आहेत. आजारपणाच्या नावाखाली जिनोममध्ये बदल करण्याची दिलेली परवानगी ही खरेच गरजेची होती का? कारण आजारपणाच्या उपचारासाठी जीन मिळवण्याच्या (एडिटिंग) तंत्रज्ञानाचा वापर आता वाढला आहे. अलीकडेच सोमेटिक जीन एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून ‘सिकल सेल’ आजारावर परिणामकारक उपचार विकसित केले आहेत. यासाठी भ्रूणामध्ये अनुवांशिक संशोधन करण्याची गरज नसते. या तंत्रज्ञानानुसार आजारी माणसांच्या पेशीत बदल करता येऊ शकतो. म्हणूनच जिनोम बदलाबाबत निष्णात असलेल्या तज्ज्ञांंना उपचाराच्या नावाखाली भ्रूणामध्ये संशोधन करण्याचा मुद्दा पचनी पडलेला नाही. कारण मानवी गुणसूत्रांमध्ये पंचवीस लाखांवर डीएनए जोडलेले असल्याने ही प्रक्रिया सोपी नाही, हे लक्षात घ्यायला हवे.
जनुकीय सुधारित बालकांचा धोका म्हणजे अशा प्रयोगातून जन्माला आलेले अपत्य हे कोणालाच बांधील राहणार नाही. कुटुंब आणि समाजाशी त्याचे कोणतेही नाते राहणार नाही. अशा स्थितीत त्याचा वापर नेहमीच मानवतेच्या कल्याणासाठी होईल, याची हमी कोण देणार?
विज्ञान नेहमीच मानवजातीच्या भल्यासाठी काम करीत आले आहे. जनुकात बदल करण्याचे तंत्र विकसित होण्यापूर्वीही काही प्रयोग करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, 2017 मध्ये एका विज्ञानविषयक मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, अमेरिका आणि दक्षिण कोरियामधील शास्त्रज्ञांच्या चमूने हृदयाच्या स्नायूंची जाडी वाढविणार्या जनुकांना क्रिस्पर कॅस-9 या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हटविले होते.
हृदयाच्या स्नायूंची जाडी वाढल्यामुळे उद्भवणार्या हायपरट्रॉपिक कार्डियोमायोपॅथी नावाच्या आजाराने दर पाचशे व्यक्तींमागील एक व्यक्ती प्राणास मुकण्याचा धोका असतो. या आजारात हृदयाच्या स्नायूंच्या भिंती अधिक जाड होतात. त्यावर जनुकांमध्ये काटछाट करून उपाय शोधून काढल्यानंतर असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता की, जनुकांमध्ये बदल घडविल्यास शास्त्रज्ञ आणि डॉक्टर भविष्यात कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराच्या पेशीही शरीरातून हटवू शकतील आणि असे भयावह आजार हद्दपार करता येतील.
या यशस्वी प्रयोगानंतर असा दावा करण्यात आला होता की, जनुकातील बदलांच्या तंत्रज्ञानामुळे शरीरातील सुमारे दहा हजार अनुवंशिक त्रुटी भरून काढण्याचा रस्ता खुला होऊ शकेल. पण जनुकात बदल करण्याच्या या कथित चमत्कारावर जगातील अनेकांनी हरकत घेतली होती. कारण अशा प्रकारच्या संशोधनांच्या माध्यमातून माणूस थेट निसर्गाच्या कामात हस्तक्षेप करत आहे. परंतु ज्या आजारांवर औषध किंवा उपचार तोकडे पडतात, तिथे अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाला परवानगी देण्यास अडचण असण्याचे कारण नाही, असे मानणारा एक वर्ग आहे. असे असले तरी मानवी समुदाय या तंत्रज्ञानाचा वापर तेवढ्यापुरताच सीमित ठेवेल, याची शाश्वती देता येत नाही. या तंत्रज्ञानाचे गैरफायदे घेतले जातील, असे आजवरच्या अनुभवावरून तरी वाटते. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेच्या निर्णयानंतर जग हादरून गेले आहे.