मेळघाटात जादूटोणा केल्याच्या संशयावरून वृद्ध आदिवासी महिलेची धिंड काढून तिला मारहाण करण्यात आली.(file photo)
Published on
:
18 Jan 2025, 6:44 am
Updated on
:
18 Jan 2025, 6:44 am
अमरावती, पुढारी वृत्तसेवा : जादूटोणा केल्याच्या संशयावरून ७७ वर्षीय वृद्ध आदिवासी महिलेची धिंड काढून तिला मूत्रप्राशन करावयास भाग पाडले. एवढेच नव्हे तर सळाखीचे चटके देऊन मारहाणही करण्यात आली. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना मेळघाटात चिखलदरा (Chikhaldara) तालुक्यात रेहट्याखेडा या गावात घडली आहे.
३० डिसेंबर रोजी हा प्रकार घडला असून याप्रकरणी १७ जानेवारी रोजी अमरावती जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेविषयी सविस्तर असे की, ७७ वर्षीय आदिवासी वृद्ध महिला घटनेच्या दिवशी शौचास बाहेर जात असताना शेजाऱ्यांनी जादूटोण्याचा आळ घेऊन तिला दोरखंडाने आधी बांधून ठेवले आणि नंतर मारहाण करत तिला लोखंडी सळाखीचे चटके दिले. तिला बळजबरीने मूत्रप्राशन करण्यास भाग पाडले. ग्रामस्थ एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी तोंडाला काळे फासून तिची गावातून धिंड काढली. विशेष म्हणजे गावातील कायदा आणि सुव्यवस्थेची प्राथमिक जबाबदारी असलेला पोलीस पाटीलही या सर्व घटनाक्रमात सहभागी होता.
शुक्रवारी (दि.१७) पीडित महिलेच्या कुटुंबाने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेऊन तक्रार दिली. त्यावेळी हा माणुसकीला काळीमा फासणारा पुरोगामी महाराष्ट्रातील प्रकार समोर आला. याप्रकरणी स्थानिक पोलिसात तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने राज्य महिला आयोग, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी आदींना तक्रारीची प्रत पाठविण्यात आली आहे.
६ जानेवारीला पीडित महिलेने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार, तसेच इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेला नाही. त्यामुळे आता ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासन यासंदर्भात काय कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.